पहिली प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया !

जिल्ह्यात सर्वप्रथम संवत्सरच्या शाळेत शंभर टक्के पहिली प्रवेश पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षातील पहिलीच्या शाळा प्रवेशाचे नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी ऑनलाईन गुगल फॉर्म तयार केले असून या फॉर्मद्वारे पहिलीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून याची माहिती घेऊन जिल्ह्यात अन्य तालुक्यांत ही प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली.

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील शाळा बंद असून सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे या काळात ऑनलाईन पद्धतीने शाळा प्रवेशाचे नियोजन करण्यात येत आहे. राज्यात दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होतात. याआधी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत शाळांकडून नव्याने पहिली प्रवेशासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येते. यावेळी मात्र, कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद आहेत. शिक्षक सुद्धा शाळेत येत नाहीत. या काळात स्टडी फ्रॉम होम पद्धतीने अभ्यास घेण्यात येत आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेशाचे नियोजन सुद्धा ऑनलाईन केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांनी नियोजन सुरू केले आहे.

काही शाळांनी गुगल फॉर्म तयार केले आहेत. या फॉर्मद्वारे पालकांकडून माहिती मागवण्यात येत आहे. पालक सुद्धा फॉर्म भरून पाठवत आहेत. यामुळे शाळा प्रवेशासाठी पालकांना शाळेत येण्याची आवश्यकता राहणार नाही. शाळांकडून अशा पद्धतीने माहिती संकलित करण्यात येत आहे. याबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शाळा प्रवेशाचे नियोजन करण्याबाबत शाळांना दरवर्षी सूचना देण्यात येत असतात. त्यानुसार शाळा प्रवेशाचे नियोजन केले जाते, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या वाढ करण्यासाठी शाळांनी नियोजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नेहमीच देण्यात येतात. शाळांचा पट वाढणे महत्त्वाचे आहे. यासाठी शाळा त्यांच्या स्तरावर शाळा प्रवेशाचे नियोजन करतात. याआधी मात्र शाळा प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी गावात सर्वेक्षण केले जात होते. यावेळी असे सर्वेक्षण शक्य होणार नाही. हे लक्षात आल्यानंतर शाळांनी हा उपाय केला आहे. गुगल फॉर्म तयार करून याद्वारे माहिती मागवण्यात येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शाळेने राबविलेल्या ऑनलाईन उपक्रमाची माहिती जिल्ह्यातील होतकरू आणि उपक्रमशील शिक्षक घेत असून त्याच धर्तीवर हा उपयुक्त उपक्रम राबवत आहे. यामुळे यंदा पहिलीतील शाळा प्रवेशाच्या अडचणीवर मात करता येणे शक्य होणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात पहिलीचा प्रवेश रखडला जाऊ नये, यासाठी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जि.प. शाळेने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यास सुरू केली. यासाठी गुगलवर ऑनलाईन अर्ज तयार करण्यात आला असून त्याव्दारे शंभर टक्के पहिली प्रवेश करून घेण्यात आले आहेत. यासह प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे दाखले शाळेकडे जमा झाले आहेत. संवत्सरच्या शाळेच्या उपक्रमाची माहिती जिल्ह्यातील तरूण होतकरू शिक्षक शिक्षण विभागाच्या मार्फत घेत असून त्याव्दारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
– राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य, तथा शिक्षण समिती सदस्य.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *