अन्य खतांच्या दोन गोण्या घ्या, तरच युरिया मिळेल

अन्य खतांच्या दोन गोण्या घ्या, तरच युरिया मिळेल

राहुरी तालुक्यातील कृषीसेवा केंद्र चालकांचा फतवा; शेतकर्‍यांना खते उपलब्ध करून द्या- निमसे

माहेगाव (वार्ताहर)- राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. अन्य खते खरेदी केली तरच युरिया मिळेल, अशी अट विक्रेत्यांनी घातली आहे. इतर खताच्या दोन गोण्या खरेदी केल्यास सोबत एक गोणी युरिया दिली जात असल्याने सामान्य शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. कृषी विभागाने चौकशी करून युरिया खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

राज्याच्या कृषीमंत्र्यांनी नुकतेच खरिपासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर रासायनिक खते, औषधे दिली जातील, अशी घोषणा केली. परंतु बांधावर तर सोडाच पण दुकानात जाऊन सुध्दा युरिया मिळत नाही. अशी परिस्थिती तालुक्याच्या पूर्वभागात निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात मुळा डाव्या कालव्याला आवर्तन सुरू असल्याने उसाच्या पिकाला युरिया खताची गरज असल्याने शेतकरी युरियाची मागणी करताना दिसत आहेत. मात्र कृषीसेवा केंद्र चालकांनी दाणेदार खते 10ः26ः26, डीएपी 20ः20ः00 अशी खते घेणार असाल तरच युरिया मिळेल, अशी शेतकर्‍यांची अडवणूक सुरु केली आहे.

अवकाळी पाऊस त्यातच लाकडाऊनमुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे इतर खतासाठी शेतकरी पैसे गुंतवू शकत नाही. 290 रुपयाच्या एका युरिया गोणी खतासाठी तीन हजार रुपयांची इतर खते खरेदी करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. कृषी विभाग मात्र, उघड्या डोळ्याने सर्व बघत आहे. शेतकर्‍यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी, असा सल्ला राहुरी पंचायत समिती कृषी विभागाकडून दिला जात आहे. राज्याचे कृषीमंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर खते देण्याची भाषा करतात. तर मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसत आहे. तरी जिल्हा कृषी विभागाने चौकशी करून युरिया खते उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

रासायनिक खतांच्या कंपनी कडे युरिया खताची मागणी केली असता इतर दाणेदार खते घ्या तरच युरिया दिली जाईल, अशी अडवणूक कंपन्या करीत असल्याने आम्ही विक्री करताना इतर खते घेणार्‍या शेतकर्‍यांनाच युरिया देतो. आमची देखील कंपन्या अडवणूक करतात, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
– एक कृषी सेवा केंद्र चालक, राहुरी पूर्वभाग.

टाकळीमिया (वार्ताहर)- अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील गहू, हरभरा, कांदे आदी पिके काढून व त्यापूर्वीही अनेक क्षेत्रात ऊस लागवड केली आहे. सध्या मुळा धरणातून आवर्तन चालू आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी ऊस पिकाची मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, उसासाठी प्राथमिक रासायनिक खत म्हणून वापरल्या जाणार्‍या युरियाची टाकळीमिया परिसरात टंचाई असून युरियाऐवजी तत्सम अधिक मात्रा असलेले महागडी खते पर्याय म्हणून वापरावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नेमके हंगामातच युरियाची टंचाई का निर्माण होते? असा सवाल डॉ. तनपुरे सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी केला आहे.

मागील तीन चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्याने तीव्र पाणीटंचाईमुळे अनेक शेतकर्‍यांनी ऊस लागवड केली नव्हती. त्यामुळे अनेक कारखाने उसाअभावी बंद ठेवावे लागले. त्याकाळात शेतकर्‍यांनी थोड्याशा पाण्यावर इतर पिके घेतली. मात्र, त्या पिकांनाही नैसर्गिक अपत्तीचा फटका बसल्याने शेती व्यवसाय आतबटट्याचा होऊन मोठी आर्थिक हानी झाली. खरिपात गहू, हरभरा, कांदे आदी पिके घेतली. त्यावेळीही ऐन मशागतीच्या वेळी युरिया टंचाईचा फटका बसला. आता यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा पुरेसा आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी उसासारख्या शाश्वत पिकाकडे वळला. मात्र, आता ऐन मशागतीची कामे सुरू असताना युरिया मिळेनासा झाला आहे. जिथे एक युरियाची गोणी लागते, तिथे तत्सम मात्रा असलेल्या दुसर्‍या दोन जास्त किंमतीच्या दोन गोण्या टाकाव्या लागतात. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागल्याने मोठे आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. मात्र, आता करोनामुळे दुधाची मागणी कमी झाल्याचे कारण पुढे करून दूध संकलन करणारे 20 रुपयांपेक्षाही कमी भाव देत आहेत.

तसेच अनेक शेतकर्‍यांनी फळबाग लागवड केली व इतरही भाजीपालावर्गीय पिके घेतली. मात्र, या मालालाही वाहतूक बंदीचा फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शासनाने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी निमसे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com