Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेतकर्‍यांच्या भाजीपाला व फळपिकांचे प्रचंड नुकसान

शेतकर्‍यांच्या भाजीपाला व फळपिकांचे प्रचंड नुकसान

फळे, भाजीपाला शेतातच पडून; दूध उत्पादकांचेही झाले मोठे नुकसान

नेवासा – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश-राज्य पातळीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊन, खासगी वाहतूक बंदी व बाजार बंदीमुळे अनेक शेतकर्‍यांच्या भाजीपाला-फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मागणी आणि विक्रीची सुविधा नसल्याने केळी-कोबी यासह इतर शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

- Advertisement -

बर्‍यापैकी पाणी उपलब्ध असल्याने यावर्षी नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांनी ऊस, कांदा, केळी, डाळींब या सारख्या नगदी पिका बरोबरच टोमॅटो, वांगी, कोबी, ढेमसे यासारखी भाजी-पाल्याची तसेच खरबूज-टरबूज (कलींगडाची) लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येत आहे. हे भाजी-पाल्याचे पीक दोन-तीन महिन्यांचे असते. त्यामुळे क्षेत्र वाढले आहे. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. बाजारपेठा बंद झाल्या. एकराने लागवड असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादीत झालेल्या मालाची विक्री करताना शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. हजारो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेले भाजीपाल्याचे फ्लॉट जसेच्यातसे पडून आहेत. हातातोंडाला आलेले पीक शेतात खराब होत चाललेय.

लॉकडाउनमुळे व्यापारी शेतात येऊन माल घेण्यास तयार नाही आणि खासगी वाहतूक बंद असल्याने जिल्हा-तालुका सीमा लॉक करण्यात आल्याने शेतकर्‍यांनाही आपला माल बाहेर पाठवता येत नाही. शेतात पडून असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांनी भाजीपाला वाशी (मुंबई) मार्केट, पुणे, औरंगाबाद, नगर या शहरातील भाजी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी जात असतो. परंतु या चारही शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याने ही सर्व शहरे 100 टक्के लॉकडाऊन असून अंतरजिल्हा सीमा लॉक करण्यात आल्याने व खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडू शकत नसल्याने या शहरातील व्यापारी माल खरेदी करण्यास तयार नाहीत.

त्यामुळे जरी प्रशासनाकडून शेती मालवाहतूकीचा परवाना मिळाला तरीसुद्धा कुठलाच व्यापारी माल नेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे शेतकरी वेगळ्याच संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतात उभ्या पिकांत रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील नानासाहेब विठोबा तागड या शेतकर्‍याने नवीन लागवड केलेल्या ऊसाचे पिकात कोबीचे आंतरपीक घेतले. ऊस लागवड केल्यानंतर औताने सरी-वरंबा सपाट करून तयार केलेल्या बेडवर कोबीची लागवड केली.

ऊसासाठी ठिबक सिंचनद्वारे केलेल्या पाणी आणि खते व्यवस्थापनाचा फायदा कोबी पिकालाही होऊन कोबीची झपाट्याने व जोमदार वाढ होऊन तीन महिन्यात कोबी विक्रीसाठी तयार झाला. कोबीचा एक एक गड्डा किमान 1 ते 2 किलो पर्यंत वजनाचा झाला. मात्र नेमका विक्रीच्या तोंडावर कोरोना लॉकडाऊन झाले आणि सर्व कोबी जसाच्या तसा शेतात पडून राहिला.त्याचा परिणाम कोबीचा गड्डा वाढत जाऊन तो 3 ते 5 किलो वजनापर्यंत गेला. अशा परिस्थिती तालुक्यातील स्थानिक आणि तालुक्याबाहेरील आठवडा बाजार बंद, आडते लिलाव बंद असल्याने श्री. तागड यांचा एक एकर क्षेत्रातील कोबी तसाच शेतात पडून आहे.

त्याचबरोबर बबनराव विठोबा तागड यांचा 2 एकर तर ज्ञानदेव विठोबा तागड यांची दीड एकर क्षेत्रात केळीची बाग आहे. सध्या या केळीच्या झाडाला प्रत्येकी जवळपास 50 किलो वजनांचे घड लागलेले आहेत. सध्या त्यांचा माल हार्वेस्टिंगला (काढणीस) आलेला आहे. परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे मजुरांची कमतरता, वाहतूक बंद, बाजारपेठा बंद, केळी खरेदीदार व्यापारी मिळेनात, केळी पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे रायपनिंग चेंबरही बंद आहेत. यामुळे केळीची काढणी पूर्णपणे थांबलेली आहे. या सर्व बाबींचा परिणाम आणि उन्हाची वाढती तीव्रता यामुळे केळीची झाडे घडाचे वजनाने मधूनच मोडत आहेत. झाड मोडल्याने केळीचे घडचे घड जमिनीवर पडत आहेत. त्याचबरोबर काढणीस आलेले केळाचे घड झाडावरच पिकण्याची वेळ आलेली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलेले आहेत.

दुधाचे भावही गडगडले
तालुक्यातील दुग्ध व्यवसायावरही कोरोना लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दूध संकलनात वाढ झालेली असताना लॉकडाऊनमुळे दूध विक्री कमी झाली. तसेच दूध पावडर तयार करणे वगळता दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग जसे पिशव्यातील दूध पॅकेजिंग, आईस्क्रीम, खवा, मसाला दूध, चीज, बटर, मसाला ताक, पनीर तयार करणारे उद्योग बंद असल्याने संकलित झालेल्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न दूध संकलन केंद्र व डेअरी व्यवसायिकांपुढे निर्माण झाल्याचा परिणाम प्रत्यक्ष दूध उत्पादकावर झाला आहे. दूध उत्पादकांना लॉकडाऊन पूर्वी म्हशीच्या दुधाला (6.0 फॅट व 9.0 एनएसएफ) प्रतिलिटर 42 रुपये दर मिळत होता तो आज 33 रुपये मिळत आहे. तर लॉकडाऊन पूर्वी गाईचे दुधाला (3.5 फॅट व 8.5 एनएसएफ) प्रतिलिटर 32 रुपये दर मिळत होता तो आज 22 रुपये मिळत आहे. म्हणजेच दररोज दूध उत्पादकांचा प्रतिलिटर सुमारे 10 रुपयांचा तोटा होत आहे. एकीकडे दुधाचे भाव घसरले आणि दुसरीकडे मात्र पशुखाद्य व चार्‍याचा भाव वाढलेला आहे. या परिस्थितीत पशुधनाच्या चार्‍याचा खर्च सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती दूध उत्पादकांवर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या