पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत शेतकरी जखमी
Featured

पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत शेतकरी जखमी

Sarvmat Digital

खिशातील मोबाईलही फुटला ; श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानची घटना

टाकळीभान (वार्ताहर)- कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र सध्या रब्बी हंगामी पिकांची काढणी सुरु असल्याने व कोरोनामुळे मजुरही मिळत नसल्याने घरच्या दोन महिलांसह दुचाकीवरुन बसस्थानक परिसरातून शेताकडे जात असलेल्या तरुणाला पोलिसांनी मारहाण केली. यात तरुणाच्या हाताचे हाड तुटले आहे तर खिशातील किंमती मोबाईलही फुटला आहे.

टाकळीभान परिसरात मुठेवाडगाव रोडलगत अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके यांची वस्ती आहे. सुमारे शंभर लोक साळुंके परिवारातील या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तर टाकळीभान शिवाराच्या चारही दिशांना त्यांच्या शेतजमिनी आहेत. सध्या रब्बी हंगामी पिकांची काढणीचे काम सुरु आहे. कोरोनाच्या भितीमुळे शेती कामासाठी मजुर मिळत नसल्याने अनेक शेतकरी कुटूंबातील सर्व सदस्यांना सोबत घेवून पिके काढणीच्या कामात व्यस्त आहेत.

सोमवारी सकाळच्या वेळी नितीन भाऊसाहेब साळुंके हे आपल्या राहत्या मुठेवाडगाव रोडवरील वस्तीवरुन टेलटँक परिसरातील शेताकडे दुचाकीवरुन कुटूंबातील दोन महिलांना घेवून कांदा काढणीच्या कामासाठी जात होते. बसस्थानक परिसरातुनच हा रस्ता जात असल्याने दुचाकी या परिसरातून जात असताना संचारबंदीचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने कुठे फिरतो म्हणत दुचाकी चालवत असलेले साळुंके यांच्या हातावर जोराने काठी मारली.

साळुंके यांच्या हातावर जोराचा मार लागल्याने त्यांच्या उजव्या हाताला तीव्र वेदना सुरु झाल्या. कुटूंबातील सदस्य आल्यावर त्यांनी नितीनला श्रीरामपूर येथील रुग्णालयात तपासणीला नेले. मात्र तेथील सर्व रुग्णालये बंद असल्याने स्थानिक रुग्णालयात एक्सरे काढला असता हाड तुटल्याचा अहवाल आल्याने त्यांच्या हाताला प्लॅस्टर करण्यात आले आहे. त्यासोबतच काठीच्या माराने त्याच्या खिशातील मोबाईललाही मार लागल्याने चौदा हजार रुपये किंंमतीचा मोबाईल फोनही तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे त्या गृहिणी मात्र चांगल्याच गोंधळून गेल्या होत्या.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत सुरु केलेल्या संचारबंदीचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र सध्या शेतकर्‍यांची रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली आहेत. मजुराअभावी घरच्या घरी पिके सोंगणीची कामे करीत आहे. पोलीस कर्मचार्‍यांना सांगूनही ते चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम करीत आहेत. बिनकामाच्या फिरणार्‍यांचा नेहमीच पोलिसांभोवती गराडा पडलेला असतो. त्यांच्यावर कारवाई न करता शेती कामासाठी घरच्या महिलांना घेवून जाणार्‍या तरुणाला मारहाण करणे हा प्रकार योग्य नाही. असे झाले तर आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांची पिके तशीच शेतात पडून राहुन मोठे आर्थिक संकट शेतकर्‍यावर येईल. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी वस्तुस्थिती समजावून घेवूनच कारवाई करावी.

– ज्ञानदेव मोहन साळुंके, माजी चेअरमन, अशोक सह.साखर कारखाना.

Deshdoot
www.deshdoot.com