32 हजार शेतकर्‍यांना बांधावर खते, बियाणे वितरण

jalgaon-digital
3 Min Read

कृषी विभाग : खरिपाची तयारी सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना संसर्ग आणि लॉकडाऊन चारमधून कृषी उद्योग, व्यवसाय आणि शेतकर्‍यांना वगळण्यात आले आहे. दरम्यान खरीप हंगाम जवळ आला असून यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यातील 32 हजार शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर रासायनिक खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दुसरीकडे हंगामासाठी जिल्ह्यात 1 लाख 17 हजार मेेट्रिक टन रासायनिक खते आणि 20 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली.

नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा असला तरी अलिकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात खरीप हंगामाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. खरिपातील बाजरी या पारंपारिक पिकासोबतच आता शेतकरी कापूस, सोयाबीन आणि कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहे. यामुळे जिल्ह्यातील खरिपाचे क्षेेत्र वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 4 लाख 78 हजार 638 हजार असून गेल्या काही वर्षात त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी प्रत्यक्षात 5 लाख 79 हजार 709 हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदा देखील हवामान खात्याने समाधानकारक पाऊस सांगितल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. आधीच करोनामुळे सर्वांचे कंबरडे मोडल्याने आता शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोना लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना भाजीपाला आणि धान्य मिळावे आणि शेतकर्‍यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

यामुळे कृषी विभागाला सरकारने काही सवलती दिल्या होत्या. आता प्रत्यक्षात हंगामाला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाने आता 15 दिवसांपासून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांना खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. यात 1 हजार 147 शेतकरी बचत गटांमार्फत 32 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 945 मेट्रीक टन रासायनिक खते आणि 221 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आता तर जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने शेतकर्‍यांना बाजारपेठेत सर्व उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्स
राज्यस्तरीय खरीप आढावा नियोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंबईतून प्रत्येक जिल्ह्याची खरीप आढावा नियोजन सभा व्हिडिओ कॅन्फरन्सव्दारे घेणार आहेत. या सभेला सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना त्यांच्या पालक जिल्ह्यात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नगरमधून जिल्ह्याचे पालकमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या खरीप आढावा व नियोजन व्हिडिओ कॉन्फरन्स सभेला उपस्थित राहणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *