Saturday, April 27, 2024
Homeनगरबाहेर ‘दिवे’ लावणारे मतदारसंघात कधी ‘उजेड’ पाडणार ?

बाहेर ‘दिवे’ लावणारे मतदारसंघात कधी ‘उजेड’ पाडणार ?

विजेच्या समस्यांकडे उर्जामंत्री तनपुरेंचे दुर्लक्ष; राहुरीच्या शेतकर्‍यांची नाराजी

राहुरी (प्रतिनिधी)- मागील आठवड्यात निसर्ग वादळवार्‍याचा मोठा फटका राहुरी तालुक्यासह मतदारसंघाला बसला. राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यांच्या राहुरी मतदारसंघातील गावांमधील एकूण 181 विजेचे खांब कोसळून पडले. महावितरणचे अतोनात नुकसान होऊन शेतकर्‍यांनाही आर्थिक फटका बसला. या वादळाला आता तब्बल आठ दिवस उलटून गेले आहेत. अद्यापही राहुरी मतदारसंघातील अनेक गावांत विजेचे खांब बसविण्यात आलेले नाहीत. तर अनेक गावांत आजही वीजपुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांना पाणी असूनही केवळ विजेअभावी ताटकळून राहण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

मात्र, राज्याचा उर्जामंत्रिपदाचा भार सांभाळणार्‍या प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील महावितरणच्या नुकसानीचा आढावा घेतला नाही. मतरदारसंघात न फिरकता ना. तनपुरे हे राज्यात नुकसानीचा आढावा घेत असल्याने ‘बाहेर दिवे लावणारे मतदारसंघात कधी उजेड पाडणार?’ असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे. राहुरी मतदारसंघातील विजेचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. शेतकर्‍यांसह नागरिकांना विजेचा पुरवठा होत नसल्याने सर्वचजण हतबल झाले आहेत. निसर्गाच्या तडाख्यात राहुरी मतदारसंघात अनेक ठिकाणी रोहित्र जळाले, विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत.

आठ दिवस उलटून गेले तरीही अद्याप रोहित्र बसविण्यात आले नाहीत. तर अनेक शेतकर्‍यांना यापूर्वीही अनेक दिवस मागणी करूनही रोहित्र मिळत नाहीत. जळालेल्या रोहित्रांच्या जागेवर बसविण्यासाठी अद्यापही नवीन रोहित्र मिळालेले नाहीत. विजेच्या अनेक समस्या आहेत, याकडे ना. तनपुरे यांचे दुर्लक्ष झाल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांमध्ये उमटली आहे.

पाथर्डी, नगर तालुक्यांत पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. अनेक शेतकर्‍यांना मागणी करूनही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे मतदारसंघाला उर्जाखाते मिळूनही असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात न फिरकता, हे मंत्री बाहेर करतात तरी काय? असा सवाल करीत बाहेर दिवे लावणारे मतदारसंघात कधी उजेड पाडणार? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना किती नागरिकांना आधार दिला? शेतकर्‍यांकडून धान्य गोळा करून ते वाटप करून स्वतःच्या नावावर खपविण्याचे उद्योग केले. आम्ही धान्य वाटप सुरू केले तर तेथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किती स्वखर्चाने लॉकडाऊनमध्ये मदत केली? विरोधी गटातील तरुणांना पोलीस केसेसमध्ये अडकविण्याचे उद्योग सुरू आहेत. मुळा धरणातील आवर्तनाचा प्रश्नही बिकट करून ठेवला आहे. त्यामुळे आता मतदारसंघातील नागरिकांना पश्चाताप होतो आहे. नागरिक उघडपणे नाराजी व्यक्त करीत असल्याचा गौप्यस्फोट माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या