श्रीरामपूर : मुठेवाडगावमध्ये सासर्‍याने केला जावयाचा खून
Featured

श्रीरामपूर : मुठेवाडगावमध्ये सासर्‍याने केला जावयाचा खून

Sarvmat Digital

तलवारीने केले वार ; सोन्याच्या मागणीवरून वाद विकोपाला

माळवाडगांव (वार्ताहर) –  सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून झालेला वाद विकोपाला जाऊन सासर्‍याने मित्रांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा काटा काढला. लोखंडी पाईप व तलवारीने वार करून जावयास ठार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शेतीमहामंडळ हद्दीवरील पारधी वस्तीवर पहाटे घडली. मयुर आकाश काळे (वय 28, रा. मूळ कर्जत, हल्ली मु. मुठेवाडगाव) असे मृत जावयाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडिलांच्या निधनानंतर मुलीने पतीला माहेरी आणून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे मुळचा कर्जत येथील मयुर काळे हा आपल्या पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर मुलीच्या आईने तेथीलच सचिन काळे याच्यासोबत दुसरा विवाह करून घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने पती सचिन काळे याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले.

काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास सचिन काळे (रा. मुठेवाडगाव), संदीप काळे, सुरज काळे (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) व बुंदी भोसले (रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे मयुर याच्या घरी गेले. तेथे त्यांनी मयुर व त्याची पत्नी मोनिका (वय 23) यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. ते सर्व दारूच्या नशेत होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिन याने लोखंडी पाईप, तलवार, दांडा व दगडाने मयुरला मारहाण केली. त्यात मयुरचा मृत्यू झाला. यावेळी त्यांनी मोनिकालाही मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. मयुरचा भाऊ तैमुर काळे वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यांचे घर पेटवून दिले.

सकाळी या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट दिली. तालुका पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे, सुरज काळे व बुंदी भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला.

घटनेनंतर चारही आरोपी पसार झाले होते. परंतु पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पो. कॉ.एन. आर. बर्डे, ई. डी. पवार यांच्या पथकाने तातडीने त्यांचा शोध घेऊन सचिन, सुरज व बुंदी या तिघांना सकाळी अटक केली असून संदीप हा पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मयताची पत्नी मोनिका मयूर काळे (वय 23) हिच्या फिर्यादीवरून गु.र.नं.152/2020 भादंवि कलम 302, 324, 436, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसुद खान करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com