अकोले : पिंपळगाव खांडमध्ये संपूर्ण कुटुंबच करोना बाधित
Featured

अकोले : पिंपळगाव खांडमध्ये संपूर्ण कुटुंबच करोना बाधित

Sarvmat Digital

अकोले तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आठ

केळूंगण येथे सायन रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

अकोले (प्रतिनिधी)- सायन मुंबई येथून अकोले तालुक्यातील केळुंगण येथे आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचा अहवालही आज सायंकाळी करोना पॅाझिटिव्ह आला असून तालुक्यातील करोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे. अकोले तालुक्यातील ‘त्या’ बाप -लेकी पाठोपाठ त्या व्यक्तीच्या पत्नीचा अहवालही आज सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पती,पत्नी,व त्यांची मुलगी असे संपूर्ण कुटुंबच करोना बाधित झाले आहे. दरम्यान अकोले तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आता सात झाली आहे.

पिंपळगाव खांड येथील 45 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 18 वर्षीय मुलगी या दोघांना करोनाची बाधा झाली होती.त्या कुटुंबातील व्यक्तीच्या पत्नीचा (वय 39) करोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे,त्यामुळे हे सर्व कुटुंबच करोना बाधित झाले आहे.तर पिंपळगाव खांड मधील करोना बाधितांची संख्या 4 आणि अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या आठ झाली आहे.हे सर्व जण मुबंई परिसरातून आपल्या गावी आले होते.

दरम्यान करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोलेसह राजूर, कोतूळ, समशेरपूर, शेंडी, पाडाळणे, सावरगाव पाट,वीरगाव आदी लहान मोठ्या गावांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळण्यास सुरुवात केली आहे.आजपासून तीन दिवस अकोले शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.आज अकोले शहर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे मुंबई घाटकोपर येथून आलेले होम क्वारंटाईन असलेले संपूर्ण कुटुंब करोना बाधित झाले असून सुरुवातीला बाप व लेक आणि आज शुक्रवारी आई देखील करोना बाधित असल्याचे प्रशासनाने सांगितले असून पिंपळगाव खांड येथील करोना बाधितांचा आकडा चार वर गेला असून अकोले तालुक्याचा आकडा आठवर गेल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे. गेली दोन महिने अकोले तालुक्याने करोनाला रोखून धरले होते.

परंतु मुंबईहून आलेल्या लिंगदेव , ढोकरी , समशेरपूर आणि आता पिंपळगावखांड येथे चार रुग्ण आढळले आहेत. पिंपळगाव खांड येथे दि. 22 मे 2020 रोजी मुंबई घाटकोपर येथून खाजगी वाहनावर चालक म्हणून असलेल्याचे कुटुंब आपली पत्नी व मुलीसह गावाकडे आले होते. ते आल्यावर आपल्या घरीच क्वारंटाईन झाले होते . दि. 25 रोजी गावातीलच एक 60 वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल आला. त्याच दिवशी या कुटुंबातील त्या सर्वांना अहमदनगर येथे करोना तपासणीसाठी नेले होते पैकी वडिलांचा व मुलीचा अहवाल प्रारंभी पॉझिटिव्ह आला तर आज त्याच कुटुंबातील 39 वर्षीय महिलेचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब करोनाच्या विळख्यात सापडले आहे.

दरम्यान तालुक्यातील केळुंगण येथे दोन दिवसांपूर्वी आलेला एक 40 वर्षीय सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करणार्‍या व्यक्तीला त्रास जाणवू लागला.त्याने राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली.त्यास जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.तेथे त्याचा स्वॅब घेतला गेला. त्याचा अहवाल आज सायंकाळी तालुका प्रशासनाला मिळाला.त्यात तो करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

पाडाळणे येथील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अकोले तालुक्यात मुंबईहून आलेल्या लोकांचेच अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने अकोल्याची मुंबईकरांनी काळजी वाढविली असून अकोले तालुक्यात सुमारे 10 ते 12 हजार मुंबईकर आले आहेत . यातील अनेकजण हे विना परवानगी व विना वैद्यकीय तपासणी आले आहेत, तालुक्यातील चेक नाके हद्दीवर असणार्‍या चौक्या या फक्त नावाला उरल्या आहेत. प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र सध्या पहावयाला मिळत असल्याने करोनाचा हा आकडा वाढला तर कुणाला आश्चर्य वाटायला नको.

Deshdoot
www.deshdoot.com