इंग्रजीत याद्या लावल्याने शेतकर्‍यांची मोठी पंचाईत
Featured

इंग्रजीत याद्या लावल्याने शेतकर्‍यांची मोठी पंचाईत

Sarvmat Digital

‘कोणी इंग्रजी वाचून दाखविता का हो ?’ असे म्हणण्याची शेतकर्‍यांवर वेळ

कोर्‍हाळे (वार्ताहर) – पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये शेतकर्‍यांना समाविष्ट करून घेण्याचे काम प्रत्येक गावातील महसूल विभाग कृषी विभाग ग्रामपंचायत कार्यालयांवर सोपविण्यात आले आहे. त्या विभागामार्फत जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तसेच ज्या शेतकर्‍यांच्या आधार क्रमांक बँकेशी संलग्न असलेली किंवा नावात बदल असेल असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या काही गावांमध्ये ग्रामपंचायती व महसूल कार्यालयात लावण्यात आल्या आहेत.

परंतु या याद्या चक्क इंग्रजी भाषेतून लावल्याने शेतकर्‍यांची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना साधी अक्षरओळखही नाही किंवा धड मराठी वाचता येत नाही अशा शेतकर्‍यांच्या नावाच्या याद्या संबंधित विभागाने इंग्रजी भाषेत लावून एकप्रकारे शेतकर्‍यांची चेष्टाच केल्याचे बोलले जात आहे.

राज्य शासनाने लागू केलेल्या पंतप्रधान किसान योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सगळीकडेच शेतकर्‍यांची धावपळ होताना दिसत आहे. सातबारा असणार्‍या शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना शासनाने लागू केली आहे. बरेच शेतकरी या योजनेपासून आजही वंचित आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना कागदपत्रांची जुळवाजुळव या शेतकर्‍यांच्या बँक खाते आधारक्रमांक संलग्न नाही. तसेच आधार कार्डामध्ये असणार्‍या नावाची दुरुस्ती करण्याच्या कामाला वेग आला आहे.

बँकांचे वेगवेगळे नियम शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या याद्या इंग्रजीतून असल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी अडचण ठरली आहे. शेतकरी याद्या बघून भामट्यागत होऊन माघारी फिरत आहेत. काही शेतकरी तासनतास तेथेच उभे राहून कुणी इंग्रजी वाचणारा येण्याची वाट बघताना दिसत आहे. एकंदरीतच या शेतकर्‍यांवर कोणी इंग्रजी वाचून दाखवता का म्हणण्याची वेळ ओढवली आहे.

राज्यभाषा मराठी असताना शेतकर्‍यांसाठी इंग्रजी भाषेचा अट्टाहास का? असा सवाल सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. या सर्व गोष्टीवर जिल्हा प्रशासन विभागामार्फत तात्काळ लक्ष घालण्यात यावे तसेच कमीत कमी शेतकर्‍यांसाठी तरी इंग्रजी भाषेचा वापर टाळण्यात यावा व किसान सन्मान योजने पासून एकही शेतकरी वंचित राहू नये या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

इंग्रजी भाषेत लावण्यात आलेल्या याद्या या भोळ्याभाबड्या शेतकर्‍यांची एक प्रकारे थट्टाच आहे. 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मराठी भाषेत याद्या लावण्याची मागणी करूनही सदर याद्या इंग्रजीतच लावण्यात आल्या. शेतकर्‍यांची शासनाने अशा प्रकारे अवहेलना करू नये. या सर्व गोष्टीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे.
– सोमनाथ दरंदले, निळवंडे पाटपाणी कृती समिती सदस्य

Deshdoot
www.deshdoot.com