वीज पारेषण कंपनीच्या अधिकार्‍यांसह 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल

वीज पारेषण कंपनीच्या अधिकार्‍यांसह 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल

जेवणाच्या पार्टीसाठी एकत्रित जमून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी

शिर्डी (प्रतिनिधी)- करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायद्यान्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन व कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता जेवणाच्या पार्टीसाठी एकत्रित जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करून उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील बाभळेश्वर येथील वीज पारेषण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह 7 जणांविरूद्ध लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील बाभळेश्वर येथे वीज पारेषण कंपनीचे विभागीय कार्यालय व वीज उपकेंद्र असून या विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुनील तिरमारे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कुठलीही परवानगी न घेता मोठ्या धडाक्यात साजरा करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आधिकार्‍यांसाठी वीज उपकेंद्राच्या विश्रामगृहात सुग्रास जेवणाचे नियोजन बुधवारी रात्री 8 वाजता करण्यात आले होते.

यातील कपिल उत्तमराव साठे (वय 44 रा लोणी बुद्रुक ता राहाता) , कार्यकारी अभियंता सुनील राघू तिरमारे (वय 58 रा. नाशिकरोड नाशिक), राकेश कुमार उमेश कुमार (वय 29 रा. बाभळेश्वर, तालुका राहाता), उत्तम कोंडीराम ससाणे (रा.बाभळेश्वर), नितीन भीमराज त्रिभुवन (वय 29 रा. कोल्हार, तालुका राहाता) व इतर दोन अनोळखी इसम अशा सात जणांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायद्यान्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन व कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता जेवणाच्या पार्टीसाठी एकत्रित जमून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करून उल्लंघन केले आहे.

याप्रकरणी पोलिस नाईक शरद पवार यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून लोणी पोलिसांनी कपिल उत्तमराव साठे (वय 44 रा लोणी बुद्रुक, ता.राहाता), कार्यकारी अभियंता सुनील राघू तिरमारे (वय 58 रा नाशिक रोड नाशिक), राकेश कुमार उमेश कुमार (वय 29 रा.बाभळेश्वर तालुका राहाता), उत्तम कोंडीराम ससाणे (रा.बाभळेश्वर), नितीन भीमराज त्रिभुवन (वय 29, रा.कोल्हार, तालुका राहाता) व इतर दोन अनोळखी इसम अशा सात जणांविरूद्ध साथरोग नियंत्रण कायदा तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कार्यकारी अभियंता सुनील तिरमारे यांच्या सेवा निवृतीचा समारंभ बेकायदेशीर होता. त्याची चौकशी करावी, अशी मागणी शेख तय्यब रशिद यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. या समारंभाला नाशिक व औरंगाबाद या करोनाग्रस्त जिल्ह्यांतून वीज कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच तिरमारे यांच्या पत्नीसह नाशिक येथील अनेकजण उपस्थित होते. जिल्हाबंदी असतानाही नाशिक येथून आलेल्या अधिकारी व नातेवाईकांना ई पास काढण्यात आलेला नव्हता.

तसेच नाशिक येथून आलेले मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक प्रमोद गोडसे यांनी देखील ई पास नसताना बाभळेश्वर येथील या समारंभाला हजेरी लावली तसेच चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी तोंडाला मास्क न वापरता कार्यक्रमाला उपस्थित होते, असा आरोप शेख तय्यब रशिद यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला असून या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी शेख तय्यब रशिद यांनी केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com