विजेच्या प्रश्नी दखल घेतली नाही तर शेतकर्‍यांचा उद्रेक होवू शकतो
Featured

विजेच्या प्रश्नी दखल घेतली नाही तर शेतकर्‍यांचा उद्रेक होवू शकतो

Sarvmat Digital

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा वीज वितरणच्या अधिकार्‍यांना इशारा

लोणी (प्रतिनिधी)- शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आहे परंतू सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरठ्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. वीज वितरण कंपनीच्या नियोजनशुन्य व निष्काळजी कारभारामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सध्याच्या वातावरणामुळे शेतकर्‍यांमध्ये संयम व शांतता असली तरी, ग्रामीण भागातील विजेच्या गंभीर होत चाललेल्या प्रश्नाची वेळीच दक्षता घेतली नाही तर शेतकर्‍यांच्या असंतोषाचा कधीही उद्रेक होवू शकेल, असा इशारा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला.

शिर्डी मतदार संघासह जिल्ह्यातील अन्यही तालुक्यात सध्या विजेच्या प्रश्नाने ग्रामीण भागातील नागरीक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. गोदावरी व भंडारदारा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू असुन उपसा सिंचन योजनांना विज वितरणाच्या अनियमित विज पुरवठ्याचा प्रचंड फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनाचा कोणताही लाभ होत नसल्याच्या कारणाने गोदावरी व भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आ. विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी आणि मोजक्या शेतकरी प्रतिनिधीची बैठक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाने आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाली.

याप्रसंगी विज वितरण कंपनीचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गोसावी, श्रीरामपूरचे कार्यकारी अभियंता शरद बंड, बाभळेश्वरचे उपअभियंता विठ्ठल सोनवणे, उपअभियंता देशमुख यांच्यासह प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी उपस्थित होते.

प्रारंभी बैठकीत आ. विखे पाटील व शेतकर्‍यांनी वारंवार होत असलेल्या खंडीत विजेच्या प्रश्नाचे गांभीर्य अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. मागील सरकारच्या काळात विज खंडीतही होत नव्हती. नियमानूसार भारनियमन सुरु असायचे, शेतकरी त्यानूसार नियोजन करीत होते. मग आताच अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ठरवून दिलेल्या भारनियमनापेक्षाही जास्त वेळ वीज खंडीत होत आहे, असा सवाल आ. विखे पाटील यांनी उपस्थित केला.

अधिकार्‍यांनी भारनियमनाचे वेळापत्रक निश्चित करावे, शक्य असेल तर वीज वितरीत करण्याचे चार चार दिवसांचे गावनिहाय भाग करावेत असे सूचित करुन आ. विखे पाटील यांनी सांगितले की, ज्या फिडरवर अतिरीक्त विजेचा भार असेल तिथे बेकायदेशीर वीज कनेक्शन शोधून तातडीने कारवाई सुरू करा, असे त्यांनी अधिकार्‍यांना ठणकावून सांगितले.

गावपातळीवर कार्यरत असलेल्या अभियंते व कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये थांबून वीज वितरण सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत. मुबलक पाणी असताना वीज उपलब्ध होणार नसेल तर ती शेतकर्‍यांची चेष्टाच ठरेल, असे स्पष्ट करीत आ. विखे म्हणाले की, केवळ करोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी शांत आहेत. आंदोलन करण्याची सध्याची परिस्थिती नाही, म्हणून वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या भावनांशी न खेळता वेळीच गांभीर्याने विजेचा प्रश्न निकाली काढा शेतकव्यांचा उद्रेक रस्त्यावर येण्याची वाट पाहू नका,असा इशारा आ.विखे यांनी अधिकार्‍यांना दिला.

Deshdoot
www.deshdoot.com