शिक्षण समितीने घेतले वदवून शिष्यवृत्तीचे टार्गेट
Featured

शिक्षण समितीने घेतले वदवून शिष्यवृत्तीचे टार्गेट

Sarvmat Digital

जिल्हा परिषद : शालेय पोषण आहारातील अनियमिततेच्या वसुलीचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिष्यवृत्ती परीक्षेत किती विद्यार्थी पात्र ठरू शकतात, किती विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्यास ते गुणवत्ता यादीत येऊ शकतात, याचे तालुकानिहाय टार्गेट गटशिक्षणाधिकार्‍यांकडून घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापतिपदी निवड झालेले उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेली शिक्षण समितीच्या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यासह पोषण आहारातील त्रुटीमुळे कमी वजन आढळणार्‍या ठिकाणी वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषदेची शिक्षण समितीची मासिक सभा गुरूवारी पार पडली. या सभेत सुरूवातीपासून सदस्य जालिंदर वाकचौरे आणि राजेश परजणे यांनी आक्रमक होते. शालेय पोषण आहारातील त्रुटी सुट्टीच्या कालावधीतील पोषण आहाराचे अदा केलेले बील, शिक्षण विभागाच्या चुकीमुळे शिक्षण विभागाचे बंद झालेले अनुदान आदी विषयांवर वाकचौरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर परजणे यांनी 4 थी व 8 वीची गुणवत्ता वाढ, तालुकानिहाय गटशिक्षणाधिकार्‍यांचा आढावा, शिष्यवृत्ती परीक्षा या विषयावर परजणे यांनी चर्चा केली. पोषण आहार योजनेत नगर, राहुरी, राहाता, कोपरगाव तालुक्यांत त्रुटी आढळ्या असून त्याठिकाणी वसुलीचा निर्णय घेण्यात आला.

यासह जामखेड, राहुरी, नगर येथील गटशिक्षणाधिकार्‍यांना आढावा देता आला नाही. शेवगाच्या ‘झिंगाट’ प्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांनी सभेत दिलगिरी व्यक्त करत पुन्हा असे घडणार नसल्याचेे स्पष्ट केले. पाथर्डी तालुक्यात विद्यार्थ्याला पान आणण्यास पाठविणार्‍या शिक्षकांवर कारवाईचा निर्णय झाला. पदावनवती घेतलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचे आदेश असतानाही काही ठिकाणी शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे पोषण आहाराच्या चौकशीसाठी तपासणी आणि भरारी पथके तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सभेला सदस्य वाकचौरेे, परजणे, मिलिंद कानवडे, विमलताई आगवण, उज्वला ठुबे, गणेश शेळके शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सयाजीराव गायकवाड यांचा विसर
जिल्हा लोकल बोर्डाचे रुपांतर जिल्हा परिषदेत झाले. त्यावेळी जिल्हा लोकल बोर्डासाठी इमारत बांधून देणारे बडोदा संस्थानचे कर्तृत्वान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड यांचा विसर जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरूवारी (काल) त्यांच्या पुतळ्यास साधा हार अर्पण करण्यास प्रशासन विसरले.

इंग्रजी शाळा तपासणार
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग जिल्ह्यातील इंग्रजी शाळा तपासणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह शिक्षकांची एलआयसी कपात न करण्यासोाबत शिक्षकांनी शाळेत मोबाईलचा वापर अध्यापनासाठी करावा, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी शिक्षकांसाठी परिपत्रक काढले असून त्यांचे काटेकोरपणे पालन व्हावे, नेवासा येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जास्त गुण असणार्‍या 100 विद्यार्थ्यांची नेवासा येथे निवासी कार्यशाळा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com