‘डॉ. तनपुरे’च्या जागेची थकबाकीपोटी देवळाली प्रवरा पालिकेकडून जप्ती
Featured

‘डॉ. तनपुरे’च्या जागेची थकबाकीपोटी देवळाली प्रवरा पालिकेकडून जप्ती

Sarvmat Digital

मालमत्ता कर व पाणीपट्टीचे एक कोटी 56 लाख थकले; कारखान्याच्या जागेवर पालिकेचा बोजा

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – डॉ. तनपुरे साखर कारखान्याकडील मालमत्ताकर व पाणीपट्टीचे सुमारे एक कोटी 56 लाख रुपये थकबाकीची झाल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने कारखान्यावर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमचे कलम 152, 154, 155 अन्वये जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.

देवळाली प्रवरानगर परिषदेच्या वतीने मोठ्या मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटीसा बजावून आता जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, तहसीलदारांकडे डॉ. तनपुरे कारखान्याच्या जागेवर पालिकेचा बोजा चढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून पालिकेचा बोजा कारखान्याच्या जागेवर चढविण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत डॉ. तनपुरे कारखान्याच्या लहानमोठ्या 159 मालमत्ता असून त्यांनी सन 2013-14 पासून मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. या संस्थेकडे डिसेंबर 2019 अखेर मालमत्ता कर व पाणीपट्टीची शास्तीसह 1 कोटी 56 लाख रुपये थकबाकी झाली. कर भरण्याबाबत कारखाना प्रशासन, व्यवस्थापन यांना वेळोवेळी सूचना, नोटीस देऊनही तसेच बैठका घेऊनही मालमत्ता कराची रक्कम भरली नाही. यापूर्वी वेळोवेळी नळजोडणी खंडित करण्याची कारवाई नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेली आहे.

त्यावेळी पाणीपट्टी कराची अंशतः रक्कम भरून घेऊन कारखाना वसाहतीमधील तसेच तेथे असलेल्या कामगारांची व शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये, म्हणून पुन्हा नळजोडणी करण्यात आली. तरीही कराची रक्कम भरली नाही. म्हणून महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमचे कलम 152 अन्वये जप्तीची अधिपत्र दि.27 नोव्हेंबर 2019 रोजी बजावण्यात आली आहे. या संस्थेची मालकीची जागा अडकावून ठेवण्यात आली.

5 दिवसात रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली. तरीही रक्कम न भरल्याने डॉ. तनपुरे कारखाना यांच्या मालकीच्या जागा जप्ती करून त्या जागेवर बोजा नोंद करण्याचा प्रस्ताव राहुरी येथील तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यास मान्यता मिळून कारखाना मालकीच्या जागेवर बोजाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी निकत यांनी दिली.

दरम्यान, ज्या मालमत्ताधारक, नळजोडणी धारक, गाळाभाडेधारक यांनी सन 2019-20 अखेरची मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळाभाडे भरलेले नाही, त्यांनी तात्काळ नगरपरिषदेकडे भरावी. अन्यथा कर थकबाकीधारकयांच्यावर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमचे कलम 152 अन्वये जप्तीची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कर निरीक्षक एम. एस. पापडीवाल व मुख्याधिकारी निकत यांनी दिली.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडून पुढेही पाणीपट्टी थकल्यास नळजोडणी कधीही खंडित करण्यात येईल, कारखाना वसाहतीमधील नागरिकांनी कारखाना प्रशासनाकडून वैयक्तिक नळजोडणीसाठी ना हरकत पत्र घेतल्यास वैयक्तिक नळजोडणी देण्याची तयारी पालिकेने दाखविली आहे.

ज्या मालमत्ताधारक, नळजोडणीधारक, गाळाभाडेधारक यांनी सन 2019-20 अखेरची मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळाभाडे अद्याप भरलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर भरावी, असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सर्व नगरसेवकांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com