डॉ. नीलेश शेळकेचा जामीन ‘सर्वोच्च’ने फेटाळला
Featured

डॉ. नीलेश शेळकेचा जामीन ‘सर्वोच्च’ने फेटाळला

Sarvmat Digital

शहर बँकेतील बोगस कर्जप्रकरण : संचालकांच्या अडचणींत वाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना बोगस कर्जप्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात डॉ. निलेश शेळके यांचा जामीन दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. न्यायालयाच्या या आदेशामुळे डॉ. निलेश शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शहर बँकेच्या संचालकांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. रमन, न्यायमूर्ती विनीत शरन आणि न्यायमूर्ती रामासुब्रमण्यम या तिघांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. शेळके यांनी अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने कर्जप्रकरण करून घेत त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे या दोन महिलांसह एकूण तीन डॉक्टरांनी प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल झाली आहे. डॉ. रोहिणी सिनारे, उज्ज्वला कवडे, डॉ. श्रीखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीनुसार डॉ. शेळके यांच्यासह शहर सहकारी बँकेचे संचालक मंडळ व अधिकार्‍यांविरुद्ध फसवणूक व आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान, बोगस कर्जप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेले डॉ. शेळके यांनी जिल्हा न्यायालयात याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे तो फेटाळला गेला.

यानंतर डॉ. निलेश शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली. तेथे जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने डॉ. शेळके यांचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळत असताना उच्च न्यायालयाने डॉ. शेळके यांना यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. यानुसार डॉ. शेळके यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अपील केले. तिथे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने डॉ. शेळकेचा अपील फेटाळले.

बोगस कर्जप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
मुख्य सूत्रधार डॉ. निलेश शेळके, मधुकर वाघमारे, विजय मर्दा, योगेश मालपाणी, जगदीश कदम, कराचीवाला, मुकुंद घैसास (मयत), अशोक कानडे, सुनील फळे, रावसाहेब अनभुले, सुभाष गुंदेचा, सतीश अडकटला, मच्छिंद्र क्षेत्रे, गिरीश घैसास, डॉ. विजयकुमार भंडारी, सुजित बेडेकर, शिवाजी कदम, लक्ष्मण वाडेकर (मयत), रेश्मा आठरे, निलिमा पोतदार, बाळासाहेब राऊत, संजय मुळे, दिनकर कुलकर्णी, जवाहर कटारिया, बी. पी. भागवत यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com