अरुण डोंगरे यांनी स्विकारला साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार
Featured

अरुण डोंगरे यांनी स्विकारला साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार

Sarvmat Digital

शिर्डी (प्रतिनिधी)- नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत असलेले अरुण डोंगरे यांनी काल शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला आहे.

याअगोदर शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहिलेले दीपक मुगळीकर यांची बदली परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यांच्या जागी नांदेड येथील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे सोपविला होता. काल सकाळी अरुण डोंगरे यांनी शिर्डी येथे येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रवींद्र ठाकरे यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी रवींद्र ठाकरे यांनी अरुण डोंगरे व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार केला.

2007 च्या आयएएस बॅचचे अधिकारी म्हणून असलेल्या अरुण डोंगरे यांनी याअगोदर अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. रसायन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अरुण डोंगरे 1991 साली उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत रुजू झाले. काल अरुण डोंगरे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. ते अनुभवी असले तरी त्यांच्यापुढे शिर्डी संस्थानमध्ये वेगवेगळी आव्हाने ठाकली आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com