कुत्र्याच्या तोंडात अर्भक दिसल्याने निमगावजाळी परिसरात खळबळ
Featured

कुत्र्याच्या तोंडात अर्भक दिसल्याने निमगावजाळी परिसरात खळबळ

Sarvmat Digital

निमगावजाळी (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील लोेणी-संगमनेर रस्त्यालगत असणार्‍या उसातून चार-पाच दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक कुत्रे घेऊन जात असल्याचे नागरिकांनी काल रविवारी सकाळी पाहिल्याने मोठी खळबळ उडाली.लोणी -संगमनेर रोडवरील हरिबाबा मंदिराच्या समोरील उसातून चार-पाच दिवसांचे अर्भक कुत्रे घेऊन जातांना काही नागरिकांच्या नजरेस पडले. नागरिकांनी कुत्र्याचा पाठलाग करून हे अर्भक सोडविले.

कुत्र्याने हे मृत अर्भक एका शेतात टाकून दिले. ही माहिती पोेलीस पाटील दिलीप डेंगळे यांना देण्यात आली. त्यांनी आश्वी पोलीस ठाण्यात ही खबर दिली. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार तात्याराव वाघमारे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सदर मयत अर्भक लोणी येथील प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले.

अधिक तपास पोलीस निरीक्षक मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अज्ञात महिलेने अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर नाईलाजास्तव बाळाला जन्म दिला असावा. त्यामुळे लोणी – संगमनेर रस्त्यावरून प्रवास करताना चार पाच दिवसाचे अर्भक वार्‍यावर सोडून दिले व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. अशा चर्चा तसेच इतर अनेक तर्कवितर्कांना परिसरात उधान आले होते. असे राक्षसी कृत्य करणार्‍या अज्ञात महिलेबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com