जिल्ह्यात 4 हजार तीव्र कमी वजनाची बालके
Featured

जिल्ह्यात 4 हजार तीव्र कमी वजनाची बालके

Sarvmat Digital

अकोल्यात सर्वाधिक प्रमाण; प्रकल्पनिहाय सर्वेक्षणातून बाब उघड

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात 4 हजार 80 अतितीव्र कमी वजनाची (कुपोषीत) बालके आढळून आली आहेत. आदिवासीबहुल भाग असलेल्या अकोले तालुक्यात सर्वाधिक बालके कुपोषित आढळून आली आहेत. अंगणवाडी प्रकाल्पनिहाय करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होत नसल्याने कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत राहणार्‍या शून्य ते 6 वर्षे वयोगटातील तीन लाख 22 हजार 191 बालकांचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या बालकांमध्ये 2 लाख 96 हजार 653 बालकांची स्थिती साधारण आढळून आली आहे. 21 हजार 458 बालके मध्यम कमी वजनाची तर 4080 बालके तीव्र कमी वजनाची आढळून आली.

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार शून्य ते सहा वयोगटांतील तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. बालकांची तपासणी करताना शून्य ते 6 वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात आली. त्यानुसार तीव्र कुपोषित आढळून येणार्‍या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात आला आहे. कुपोषित बालकांसाठी बाल उपचार केंद्र, राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र व ग्राम बाल विकास केंद्र या माध्यमातून उपचार, पोषक आहार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. सदर बालकांच्या पालकांना गृहभेटीद्वारे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन लवकरच करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या अकोले तालुक्यात दोन प्रकल्प केंद्र आहेत. त्यात राजूर केंद्रात मध्यम कमी वजनाची 2 हजार 24 तर तीव्र कमी वजनाची 517 बालके आहेत. अकोले केंद्रात मध्यम कमी वजनाची 1702 तर, तीव्र कमी वजनाची 427 बालके आहेत. बिगरआदिवासी भागातील तालुक्यांत तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्याही भरपूर आहे. राहुरी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांतही कुपोषित बालके आढळून आली आहेत.

प्रकल्पनिहाय तीव्र कमी वजनाची बालके
नगर ग्रामीण (61), नगर 2 (110), भिंगार (73), राहुरी (265), राहाता (336), संगमनेर (103), घारगाव 1 (191), घारगाव 2 (87), अकोले (427), राजूर (517), कोपरगाव (95), श्रीरामपूर (288), नेवासे (187), वडाळा (127), शेवगाव (134), पाथर्डी (175), जामखेड (216), कर्जत (222), श्रीगोंदा (181), बेलवंडी (77), पारनेर (208).

Deshdoot
www.deshdoot.com