जिल्ह्यात नरेगा अंतर्गत पावणेदहा हजार मजूर करताहेत काम

jalgaon-digital
4 Min Read

नेवासा तालुक्यात 156 कामांवर 684 मजुरांचे काम सुरु

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असताना करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. नगर जिल्ह्यातही नरेगा अंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यात यंत्रणा व 617 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या 1939 कामांवर 9751 मजूर काम करत आहेत. नेवासा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 117 कामे सुरु असून त्यावर 428 मजूर काम करत आहेत तर यंत्रणा पातळीवर 39 कामे सुरु असून त्यावर 156 मजूर असे एकूण 684 मजूर काम करत आहेत.

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची 46 हजार 539 कामे सुरु असून त्यावर 5 लाख 92 हजार 359 मजूर उपस्थिती आहे. करोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात आहेत. मागेल त्याला काम देण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका, मागेल त्याच्या हाताला काम नक्की मिळेल, असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

काम उपलब्ध करून देण्यामध्ये तीन विभाग आघाडीवर आहेत यामध्ये सर्वाधिक कामे ग्रामपंचायत क्षेत्रात 36 हजार 46 कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषी विभागाने 5529 कामे तर रेशीम संचालनालयाने 1329 कामे उपलब्ध करून दिली आहेत. नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 617 ग्रामपंचायतीच्या 1413 कामांवर 5909 मजूर आहेत तर यंत्रणा पातळीवर सुरू असलेल्या 526 कामांवर 1939 मजूर उपस्थित आहेत.

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठीची दक्षता…
देशात, राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या विषाणूचा प्रसार मनरेगाच्या कामांवरील मजुरांना होऊ नये यादृष्टीने मार्गदर्शक सुचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मनरेगाच्या कामांची मागणी प्राप्त झाल्यास प्राधान्याने वैयक्तिक स्वरूपाची कामे हाती घेणे, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, सोप, पेपर सोप, उपलब्ध करून देणे, मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, अंतर ठेवून काम पूर्ण होईल याची काळजी घेणे, यासारख्या सुचनांचा देण्यात आलेल्या आहेत.

राजातील जिल्हानिहाय मजुरांची उपस्थिती…
राज्यात सर्वाधिक मजूर भंडारा जिल्ह्यात आहेत. तिथे 1 लाख 31 हजार 118 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर 62 हजार 889 मजूर आहेत. गोंदिया तिसर्‍या स्थानावर असून येथे 56 हजार 192 मजूर आहेत. चंद्रपूरमध्ये 49 हजार 796 , पालघरमध्ये 44 हजार 622, गडचिरोलीमध्ये 32 हजार 551, नंदूरबारमध्ये 27 हजार 191, नाशिकमध्ये 19 हजार 567, यवतमाळमध्ये 17 हजार 196, बीडमध्ये 13 हजार 132, उस्मानाबादमध्ये 11 हजार 777, जालन्यात 11 हजार 774, धुळ्यात 11 हजार 146, अहमदनगर मध्ये 9 हजार 751, नांदेडमध्ये 8 हजार 521, बुलढाण्यात 7 हजार 874, लातूरमध्ये 7 हजार 872, औरंगाबादमध्ये 7 हजार 044, नागपूरमध्ये 6 हजार 936, जळगावमध्ये 6 हजार 887, हिंगोलीमध्ये 6 हजार 835, रत्नागिरीमध्ये 4 हजार 877, परभणीमध्ये 4 हजार 367, पुण्यात 4 हजार 016, अकोला 3 हजार 689, सोलापूरमध्ये 3 हजार 569, वर्ध्यात 3 हजार 477, सातार्‍यात 3 हजार 353, सांगलीमध्ये 3 हजार 156, वाशिमध्ये 3 हजार 133, सिंधुदूर्गमध्ये 2 हजार 343, ठाण्यात 2 हजार 156, कोल्हापूरमध्ये 1 हजार 988, रायगडमध्ये 1 हजार 564 मजूर कामावर उपस्थित आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *