जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 30 मार्चला
Featured

जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 30 मार्चला

Sarvmat Digital

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी 30 मार्चला प्रसिध्द करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मंगळवारी काढले आहेत. बँकेच्या निवडणुकीसाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 5 फेबु्रवारीला झालेल्या सुनावणीत बँकेच्या अंतिम मतदार यादीपर्यंतचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हा कार्यक्रम सुरू ठेवावा, असे प्राधिकारणाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना आदेशीत केले आहे.

राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने राज्यातील निवडणुकीत नामनिर्देशन पत्र प्रक्रिया सुरू न झालेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया तीन महिने पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. यामुळे नगर जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेत 5 फेबु्रवारीला झालेल्या सुनावणीत बँकेच्या अंतिम मतदार यादीपर्यंतचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता 27 ते 31 जानेवारी दरम्यान थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधींचा ठराव मागणी कार्यक्रम 13 फेबु्रवारी ते 18 फेबु्रवारी या पाच दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

यामुळे बँकेच्या मतदारांची प्रारूप यादी ते अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर केला आहे. यात सभासद संस्थेचे ठराव मागण्याचा अंतिम दिनांक 13 ते 18 फेबु्रवारी. 20 तारखेला प्राप्त होणारे ठराव बँकेला देण्यात येतील. 26 तारखेला बँंकेची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होईल. प्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी 6 मार्चला प्रसिध्द होईल. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी 16 मार्चला अंतिम तारिख, त्यानंतर 26 मार्चला प्राप्त हरकतीवर निर्णय घेण्यात येणार असून 30 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 30 मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे अंतरिम आदेश दिलेले आहेत. येत्या दोन आठवड्यात पुढील सुनावणी होणार असून त्यामुळे लगेच निवडणूक होतील की पुन्हा तीन महिने वाट पाहवी लागणार हे स्पष्ट होणार असल्याचे सहकारी विभागाकडून सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com