जिल्हाबंदी असताना मुंबईची होम क्वारंटाईन महिला संगमनेरात
Featured

जिल्हाबंदी असताना मुंबईची होम क्वारंटाईन महिला संगमनेरात

Sarvmat Digital

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – करोनामुळे जिल्हा बंदी असतानाही मुंबईच्या शिवडी येथील एका महिलेने काल संगमनेरात येऊन अधिकारी व एका कुटुंबासोबत हुज्जत घातली. या महिलेच्या दादागिरीनंतर संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी तिला शहरातून हुसकून लावले. मुंबईच्या एका आमदारांनी दिलेल्या पत्रामुळे सदर महिला संगमनेरात पोहचली होती. आमदार महोदयांनी करोनाच्या काळात या महिलेला पत्र दिल्याने ते अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहे.

करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. एका जिल्ह्यातील नागरिक दुसर्‍या जिल्ह्यात प्रवेश करू शकत नाही, हा उपाययोजनेचा एक भाग आहे. यामुळे कुणालाही जिल्ह्याच्या बाहेर जाऊ दिले जात नाही, असे असले तरी अनेकजण जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करताना दिसत आहेत. मुंबई येथे करोनाचे अनेक रुग्ण असल्याने मुंबईवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

अनेकांना होम क्वारंटाईनही करण्यात आले आहे. मुंबईच्या शिवडी भागातही करोनामुळे अनेकांची तपासणी केली जात आहे असे असतानाही शिवडी येथील एका महिलेने काल मुंबई ते संगमनेर प्रवास केला. संगमनेर येथे येऊन तिने हुज्जत घातली.

एका आमदार महोदयांच्या पत्राच्या आधारे ती संगमनेरात आली होती. होम क्वारंटाईन असतानाही व असे पत्र देण्याचा अधिकार नसतानाही आमदार महोदयांनी महिलेला पत्र दिल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवडी येथे राहणारी सदर महिला एका कारमधून संगमनेरात दाखल झाली होती. शहरातील नवीन नगर रस्त्यावरील एका घरमालकाशी तिने भांडण केले. अधिकार्‍यांना याबाबतची माहिती समजताच तेही नवीन नगररोड परिसरात आले. या महिलेने अधिकार्‍यांची हुज्जत घातली. यानंतर संतापलेल्या नागरिकांनी व अधिकार्‍यांनी तिला मुंबईला हुसकून दिले.

सौजन्य म्हणून सहकार्य ः आमदार महोदय
दरम्यान याबाबत आमदार महोदयांशी संपर्क साधला असता सदर महिलेला आपण पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. सौजन्य व कर्तव्य म्हणून आपण सदर महिलेला सहकार्य केले. ती दादागिरी करत असेल तर तिला संगमनेरातून हुसकून द्या, असे आमदार महोदयांनी सांगत आपण पुन्हा असे पत्र देणार नसल्याचेही ते म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com