जिल्ह्यात तळीरामांची झुंबड

jalgaon-digital
4 Min Read

श्रीरामपुरात चोप, राहुरीत दुकाने सील, संगमनेरात दोन तासांत बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- बेचाळीस दिवसांच्या खंडानंतर मंगळवारपासून दारूच्या दुकानांचे शटर मंगळवारी उघडले. दारूच्या घोटासाठी आसुलेल्या तळीरामांनी भल्या सकाळपासूनच दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या. भरदुपारी ऊन डोक्यावर घेत तळीरामांनी स्टॉक करून ठेवला. दारू बाटल्या, खंबे घेणार्‍या तळीरामांनी काही ठिकाणी नियमांचे पालन केले तर काही ठिकाणी फज्जाही उडविला. पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत तळीरामांना ताळ्यावर आणले. मद्य खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र नगर शहरातील वाईनशॉप बाहेर सर्वत्र दिसून आले.

नगरमध्ये तळीरामांच्या रांगाच रांगा पहावयास मिळाल्या. संगमनेरात मद्य प्रेमिंची गर्दी उसळल्याने येथील मद्याची दुकाने दोन तासांत बंद करावी लागली. राहुरीतही तेच घडले. परिणामी तीन दुकाने सील करण्यात आली. श्रीरामपुरात पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. राहाता, नेवासा आणि वाईन शॉपसमोर तळीरामांची गर्दी होती. अकोलेत एकच वाईन शॉप सुरू होते. तेथे मद्य खरेदीसाठी गर्दी होती.

दारू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याची माहिती सोमवारी (दि.4) सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी घोषित केली. नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक रोड, माळीवाडा, केडगाव, वाडियापार्क, चितळे रोड, बागडपट्टी, सर्जेपुरा, दिल्लीगेट, मोहनबाग, बालिकाश्रम रोड, नगर-मनमाड रस्ता, सावेडी, भिस्तबाग नाका, नागापुर, बोलेगाव फाटा परिसरात दारू विक्रीची दुकाने आहेत. मंगळवारी सकाळपासून तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी अतिरीक्त पोलीस बंदोबस्त लावला होता.

सावेडीतील पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, माळीवाडा बसस्थानक रोड, बागडपट्टी रोडवरील दारू दुकानासमोर सकाळी सात वाजेपासून रांगा लावायला सुरुवात झाली. तासाभरात ही रांग अर्धा किलोमीटरपर्यत पोहचली. काही तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले तर कहीनी त्याचा फज्जा उडविला.

दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी 3 मे रोजी संपला. तत्पूर्वी शासनाने तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढविला. हा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. रविवारी राज्य शासनाने कंटेन्मेंट झोन वगळता अन्य सर्व ठिकाणी दारू विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र नगर जिल्ह्यातील वाईनशॉप सुरू करण्याबद्दल कोणतेच आदेश जिल्हा प्रशासनाने सोमवारी दुपारपर्यंत काढले नव्हते.

सोमवारी दिवस मावळतीला जाताना नगरमध्ये दारू विक्री करणारे दुकाने उघडण्याला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला. मंगळवारपासून सकाळी 10 ते 5 या वेळेत दारू विक्री करणारे दुकान सुरू ठेवण्याचे आदेश निघाले. तेव्हापासून तळीराम घोटासाठी आसुसले होते. त्यामुळे दिवस उगवतीलाच तळीरामांनी दारूची दुकाने गाठून लाईन लावली. दुपारच्या भर उन्हातही तळीराम रांगेत उभे होते. पाच वाजेपर्यंत दारू विक्री जोमात झाल्याचे ठिकठिकाणी दिसत होते.

पोलिसांचाही राऊंड
दारू विक्रीच्या दुकानाबाहेर होणार्‍या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांची पेट्रोलिंग भरदिवसा सुरू होती. चारचाकी वाहनातून पोलीस शहरातील प्रत्येक वाईनशॉपबाहेर राऊंड मारत होते. पोलिसांची गाडी दिसताच तळीराम रांगेत उभे राहून शिस्त पाळत होते. नियमाला हरताळ फासणार्‍या तळीरामांना पोलिसांनी प्रसादही दिला.

उद्याची पण सोयपाणी !
दारूची दुकाने आज उघडली पण उद्याचा काय भरवसा, असा विचार करत एकाने चार-चार खंबे खरेदी करत आधाशीपणाचे दर्शन घडविले. इतकी दारू कशासाठी असा सवाल एका तळीरामाला केला असता त्याने उद्या बंद झाले तर काय? असा प्रतिप्रश्न करत सोयपानी नको का? असे म्हणत खरेदी केल्याचे सांगितले. दुपारनंतर मात्र याला मर्यादा घालण्यात आली. एका व्यक्तीला चार कॉर्टर दिल्या जात होत्या.

ग्राहकांची थर्मल टेस्टिंग
काही दुकानांसमोर थर्मल टेस्टिंगद्वारे येणार्‍या ग्राहकांचा ताप तपासला जात होता. तसेच ठिकठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला जात होता. काही ठिकाणी पंपाद्वारे ग्राहकांवर सॅनिटायझरचा शिडकावा केला जात होता. उत्पादन शुल्कचे अधिकारी पराग नवलकर, तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक शिस्त पाळली जाते की नाही, याची पाहणी करत होते.

वाईनशॉप बाहेर चक्क बाऊन्सर
तब्बल 42 दिवसांनी नगर शहरातील दारू व वाईनशॉप उघडल्याने दीड महिन्याच्या गॅपमुळे तळीरामांची दारू खरेदीसाठी गर्दी होईल, हे गृहित धरून सोमवारी रात्रीच वाईनशॉप बाहेर सोशल डिस्टन्सिंगची वर्तुळे आखली गेली. गर्दीवर नियंत्रणासाठी वाईनशॉप मालकांनी खाजगी बाऊन्सर व सुरक्षा रक्षक तैनात केले होते. काही विक्रेत्यांनी दुकानासमोर लोखंडी बॅरिकेट्स उभारले होते. त्यामुळे ग्राहक व दारू विक्रेते यांच्या सोशल डिस्टन्स पाळण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसत होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *