स्‍पंदन आर्टच्‍या १२ व्या मोहम्मद रफी पुरस्‍काराचे शानदार सोहळयात वितरण

स्‍पंदन आर्टच्‍या १२ व्या मोहम्मद रफी पुरस्‍काराचे शानदार सोहळयात वितरण

जम्मू काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सल्लागार आणि लक्षद्वीप चे माजी राज्यपाल फारूख खान यांचे आवाहन

मुंबई:

मोहम्मद रफीच्या गाण्यातून आपण एक तरुण, रोमँटिक काश्मीर अनुभवला. त्यावेळी एकापेक्षा एक चित्रपट आले पण आज काश्मीरवर जे सिनेमे आले त्यामध्ये दुदैवाने केवळ कश्मीर मधील आतंकवादच दाखवला गेला. आज काश्मीर एकदम शांत आहे. आज रफीच्या गाण्यातील रोमँटिक कश्मीर आपली वाट पाहतो आहे, आपण या, असे आवाहनच जम्मू काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सल्लागार आणि लक्षद्वीप चे माजी राज्यपाल फारूख खान यांनी आज येथे केले. रफी साहेबांच्या आवाजाने एकात्मता साधली, अशी भावना ही व्यक्त केली.

माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांच्या स्‍पंदन आर्ट या संस्‍थेतर्फे देण्‍यात येणा-या मोहम्मद रफी पुरस्‍कारांचे वितरण आज जम्मू काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर यांचे सल्लागार आणि लक्षद्वीप चे माजी राज्यपाल फारूख खान यांच्‍या हस्‍ते वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात एका शानदार सोहळयात झाले. यावेळी मोहम्मद रफी यांच्‍या यास्‍मीन आणि नसरीन या दोन मुली, तसेच अॅड प्रतिमा शेलार आणि आमदार अॅड आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी रफीचे चाहते असणाऱ्या विदर्भातील ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत यांचा विशेष सन्मान रफींंच्या कन्या यास्मीन यांच्या हस्ते करण्यात आला.

सन २०१९ च्या १२ व्या वर्षीचा महोम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार जेष्ठ संगितकार चित्रगुप्त यांना मरणोत्तर देण्‍यात आला असून एका लाख रुपयांचा धनादेश, स्‍मृतीचिन्‍ह व शाल असे या पुरस्‍काराचे स्‍वरूप असून तो चित्रगुप्त यांची संगीतकार मुले आनंद-मिलिंद यांनी फारुख खान यांच्या हस्‍ते स्विकारला. तर मोहम्मद रफी पुरस्‍कार 51 हजार रूपयांचा धनादेश स्‍मृतीचिन्‍ह व शाल हा पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ गायक सुदेश भोसले यांनी स्विकारला.

यावेळी पुरस्‍काराला उत्‍तर देताना आनंद-मिलिंद म्हणाले की, रफी साहेब हे माणूस म्हणून खूप मोठे होते. आम्हाला संगीतकार म्हणून त्यांच्या सोबत गाणे रेकॉर्ड करता आले नाही ही आमची सल आहे, अशा भावना व्‍यक्‍त करताच सभागृह टाळयांच्‍या कडकडाने भरून गेले.
फारुख खान म्हणले की माझे आयुष्य कश्मीरच्या खोऱ्यात पोलीस दलात गेले अनेक वेळा जखमी झालो पण पुन्हा उभा राहिलो कारण सोबत रफी साहेबांचे गाणे होते. रफींच्या गाण्याने या देशात एकात्मता साधली. आज त्याची गरज आहे. मुंबईत या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आमदार अँड. आशिष शेलार हा जो प्रयत्न करीत आहेत तो भाईचारा प्रस्थापित करणारा एक प्रयत्न आहे. देशभर हा प्रयोग व्हावा मी हा सोहळा पाहुन भारावून गेलो असून पुढच्या वर्षीचा हा सोहळा कश्मीर मधे घ्या, आम्ही आपले स्वागत करु, असे आमंत्रण ही त्यांनी आज दिले.

तसेच रफीची गाणी ऐकताना डोळ्यासमोर एक रोमँटिक काश्मीर उभा राहतो आज असाच रोमँटिक काश्मीर आपली वाट पाहतोय, तुम्ही या, काश्मीर एकदम छांत आहे, आपली वाट पाहतोय, तुम्ही या असे आवाहन त्यांनी केले. रफींच्या गाण्याने जातीधर्माच्या माणसांना जोडण्याचे काम केले . तोच धागा पकडून काम करणाऱ्या आमदार अँड. आशिष शेलार यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तर सुदेश भोसले यांनी रफींच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे. रफी साहेब ही व्यक्ती अशी होती की माझ्यासारख्यांं असंख्य जणांची आजही घरे चालवत आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आमदार अॅड आशिष शेलार यांनी केले. ते म्हणाले आज जेव्हा देशातून वेगवेळे आवाज, शोर ऐकू येत आहेत तेव्हा रफी साहेबांच्या आवाजाची जास्त गरज असून हा आवाज सगळ्या आवाजांना जोडू शकतो. सुत्रसंचालन संदिप कोकीळ यांनी केले. प्रसाद महाडकर यांच्‍या जीवनगाणी तर्फे फिर रफी ही रफी यांच्‍या गाण्‍याची मैफिल सादर करण्‍यात आली. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कार्यक्रमाला रसिकांची प्रचंड गर्दी झाली होती. श्रीकांत नारायण यांनी सादर केलेली एकापेक्षा एक रफींची गाण्यांने रंगशारदा प्रतिसादाने दणाणून गेले. रंगशारदाचे सभागृह तुडुंब भरले होतेच शिवाय तळमजल्‍यावर मोठया पडद्यासमोर बसून कार्यक्रम पाहणा-यांची संख्‍याही मोठी होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com