देवळाली प्रवरात ‘देऊळबंद’; सर्व धार्मिक स्थळांना लावले टाळे

देवळाली प्रवरात ‘देऊळबंद’; सर्व धार्मिक स्थळांना लावले टाळे

सर्वधर्मिय एकता समितीचा निर्णय

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – सध्या जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोविड-19 म्हणजे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा शहरात असणारी सामाजिक ऐक्याची परंपरा कायम रहावी, यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या सर्वधर्मीय एकता समितीच्या वतीने काल शहरातील सर्व धार्मिक ठिकाणांना कुलूप लावण्यात आले आहे.

सध्या कोरोनाला हरविण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थाही आपापल्या शहराचे नागरिकांच्या रक्षणा करीता विविध उपाययोजना करीत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष तहसीलदार एफ.आर. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याशी समन्वय ठेवून नगराध्यक्ष सत्यजित कदम कार्यरत आहेत.

सध्या कोरोना आजाराबरोबर काही विघ्नसंतोषी व्यक्ती समाजात अफवा पसरवून समजा-समाजात तेढ निर्माण करू पाहत आहेत. विविध अफवांचे सध्या पेव फुटल्याने अनेक वर्षांची सामाजिक ऐक्याची परंपरा कायम रहावी, शहरात सामाजिक ऐक्याला तडा जाऊ नये म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

काल सकाळी या समितीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, म्हाडा नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष शकील शेख, जैन संघटनेचे ललित चोरडिया, अहमदनगर जिल्हा मजदूर युनियनचे शरद संसारे, नागेश सरोदे, अन्सारभाई इनामदार, जावेदभाई सय्यद व प्रशासन प्रतिनिधी मुख्याधिकारी अजित निकत या सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करीत शहरातील ग्रामदैवत स्वामी त्रिंबकराज मंदिर, जामा मस्जिद, जैन स्थानक, सेंट मेरी चर्च, श्रीराम मंदिर, लक्ष्मी मंदिर, इस्लामपुरा मस्जिद, राहुरी फॅक्टरी येथील तिन्ही मस्जिद, हनुमान मंदिर, जैन स्थानक या सर्व धार्मिक स्थळांना सर्व संमतीने कुलूप लावून चाव्या नगर परिषदेच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत.

समितीमार्फत शहरातील सर्व धर्मांच्या देवस्थानची निगराणी, या काळात येणार्‍या तक्रारींचे निरसन, तसेच अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करू पाहणारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

येणार्‍या काळात महावीर जयंती, हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, शबे बरात असे धार्मिक सण शासकीय आदेशानुसार घरात साजरे करावयाचे आहेत.त्याच्या काटेकोर अंमलबजावणी साठी ही समिती काम करणार आहे. या समितीला शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रभाव संपल्यावर किंवा शासनाचे पुढील आदेश आल्यानंतर विधीपूर्वक कुलूप काढण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक गणीभाई शेख, गणेश अंबिलवादे, बन्सी वाळके यांनी सहभाग घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com