औद्योगिक कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील वेतन देण्याची लालबावटा युनियन व इंटकची मागणी
Featured

औद्योगिक कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील वेतन देण्याची लालबावटा युनियन व इंटकची मागणी

Sarvmat Digital

शहीद भगतसिंह स्मारक येथे लालबावटा युनियन व इंटकचे उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सर्व व्यवहार, उद्योगधंदे सुरळीत होत असताना औद्योगिक कामगारांचे लॉकडाऊनच्या काळात बळजबरीने घेतलेले राजीनामे ग्राह्य न धरता त्यांना पुर्ववत कामावर हजर करुन लॉकडाऊन काळातील वेतन अदा कराव तसेच राज्य सरकारने विडी उत्पादन व विक्रीवरील निर्बंध उठवले नसल्याने लाखो विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

विडी कामगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी विडी विक्रीस परवानगी मिळावी व कोठी येथील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटमध्ये पुर्वीप्रमाणे फळ, फुले, भाजीपाला बाजार भरविण्याच्या मागणीसाठी शनिवारी पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह स्मारक येथे लालबावटा युनियन व इंटकने उपोषण केले. 8 जून पर्यंत विडी कामगारांच्या हाताला काम न मिळाल्यास बुधवार 10 जून रोजी विडी कामगार शहरात भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील शहिद भगतसिंह स्मारक येथे उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणात कॉ. शंकर न्यालपेल्ली, कॉ.महेबुब सय्यद, कॉ.बहिरनाथ वाकळे यांनी मागणी केली. विडी कामगारांना हाताला काम मिळण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन अर्ज करुन विडी विक्रीस परवानगी मिळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र राज्य सरकार विडी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून 80 दिवस उलटून देखील हाताला काम नसल्याने विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील विडी कामगार करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन भिक मागो आंदोलन करणार असल्याचे कॉ.शंकर न्यालपेल्ली व कॉ.शंकर मंगलारप यांनी सांगितले.

एमआयडीसीमध्ये लॉकडाऊन काळात अनेक कामगारांचे बळजबरीने राजीनामे घेण्यात आले. तसेच त्यांचे लॉकडाऊन काळातील वेतन देखील अदा करण्यात आलेले नाही. अशा कंपन्यातील कामगारांचे राजीनामे ग्राह्य न धरता त्यांना पुर्ववत कामावर हजर करुन घ्यावे व लॉकडाऊन काळातील त्यांचे वेतन अदा करावे. केडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरविण्यात येणारा फळ, भाजीबाजार शेतकरी व ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे असल्याने कोठी येथील कै.दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटमध्ये पुर्वीप्रमाणे फळ, फुले, भाजीपाला बाजार भरविण्याची मागणी कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com