दोन लाखांची खंडणी मागितली
Featured

दोन लाखांची खंडणी मागितली

Sarvmat Digital

शिक्षकाच्या फिर्यादीवरून वरखेड देवस्थानच्या विश्वस्तावर गुन्हा

सलाबतपूर (वार्ताहर)- अ‍ॅट्रॉसिटीच्या दाखल केसमधील नाव कमी करण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद नेवासा तालुक्यातील वरखेड येथील शिक्षकाने दिली असून त्यावरून वरखेड येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोपान लक्ष्मण गोरे (वय 50) धंदा-नोकरी रा. वरखेड ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मी वरखेड येथील रहिवासी असून 2006 पासून मुळा एज्युकेशन संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरीस असून माझी बदली उस्थळदुमाला येथील शाळेत झालेली आहे. मी 35 किलोमीटर अंतरावर जाऊन येऊन नोकरी करीत आहे. माझा गावातील राजकारणाशी काहीही संबंध नाही.

वरखेड येथे मातंग समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मी देवीचे पुरातन मंदिर होते. गावठाणचे पुनर्वसन झाल्यामुळे वरखेड येथील रामभाऊ दाणे यांनी त्यांच्या मालकीची 23 गुंठे जमीन गट नं. 53 पैकी देवीला दिली. देवीचे मंदिर बांधले होते. मंदिर विकास व बांधकामासाठी माझ्या भावकीतील कडूबाळ गोविंद गोरे, लक्षाधीश लक्ष्मण दाणे हे ग्रामस्थ विश्वस्त मंडळामध्ये सहभागी झाले. त्यांनी पुढाकार घेऊन मंदिरात मोठे सभागृह बांधलेले आहे. मंडळात 5 मातंग समाजाचे तर अन्य 10 इतर समाजाचे विश्वस्त आहेत. विश्वस्त मंडळामध्ये विजय आश्रू शिरसाठ, त्यांचे वडील आश्रू बाळा शिरसाठ हे विश्वस्त होते व आहेत.

सध्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिरसाठ आहेत व लक्षाधिश दाणे उपाध्यक्ष आहेत. कडूबाळ गोरे हे सचिव म्हणून काम पाहतात. आश्रू बाळा शिरसाठ हा विश्वस्त मंडळाने बांधलेल्या खोल्यांपैकी एका खोलीमध्ये बळजबरीने राहतो. त्यावरून विश्वस्त मंडळाबरोबर त्याचा मुलगा विजय याचे नेहमीच वाद चालू असतात.

विजय आश्रू शिरसाठ याने कडूबाळ गोविंद गोरे याचेविरुद्ध विनाकारण अ‍ॅट्रोसिटीची केस पूर्वी दाखल केली. याबद्दल वरखेड गावातील सर्व जनता नाखूश होती. विजय याने खोटी केस दाखल केली अशी भावना सर्व गावामध्ये आहे. सदर विजय आश्रू शिरसाठ याने कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना कडूबाळ गोरे, लक्षाधीश दाणे, पुरुषोत्तम सर्जे, श्रीरंग हारदे यांच्यासोबत माझे नाव घालून त्यास 10 डिसेंबर 2019 रोजी जातीवाचक शिवीगाळ केली अशी खोटी फिर्याद 13 डिसेंबरला दाखल करण्यात आली. सदर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कडूबाळ गोरे याच्यासोबत सर्वांनी नेवासा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला. चौकशीअंती न्यायालयाने 4 जानेवारी रोजी जामीन कायम केलेला आहे.

याची हळहळ लागल्याने विजय शिरसाठ याने 6 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी मुळा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष आदींकडे अर्ज पाठवून खोट्या तक्रारी केल्या. शाळेने मागितलेल्या खुलाशावर मी खुलासा दिला. असे असताना 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या स ुमारमास त्याने माझे वस्तीवर येऊन तुझे केसमधून नाव कमी करावयाचे झाल्यास मला 2 लाख रुपये दे मी तुझे नाव कमी करतो अन्यथा तुझी नोकरी घालवीन व तुझ्यावर परत केस करीन असे म्हणाला. तसेच मी नोकरीस असलेल्या शाळेत जावून मुख्याध्यापकांशी वाद घालत तक्रारीवर काय कारवाई केली असे म्हणून लागला. त्याने यापूर्वीही खोट्या केसे करुन पैसे उकळलेले असून त्याने मला धमकी देवून खंडणी मागितली असल्याने माझी कायदेशीर फिर्याद असल्याचे सोपान गोरे यांनी फिर्यदीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 384 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com