कारवाई थांबवून परवाने नूतनीकरणाला एक महिन्याची मुदतवाढ द्या
Featured

कारवाई थांबवून परवाने नूतनीकरणाला एक महिन्याची मुदतवाढ द्या

Sarvmat Digital

जायकवाडी लाभधारक पाणी परवानगी संघर्ष समिती मोर्चा काढणार

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – जायकवाडी पाटबंधारे विभागाने नेवासा तालुक्यातील जायकवाडी जलाशयावरील शेतीसाठी पाणी उचलणार्‍या मोटारी व केबल-स्टार्टर जप्त करण्याची सुरू केलेली मोहीम थांबवावी या मागणीसाठी जायकवाडी लाभधारक पाणी परवानगी संघर्ष समितीच्यावतीने मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी एक़ वाजता नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, जायकवाडी जलफुगवट्यावर असलेल्या 1500 शेतकर्‍यांच्या वैयक्तिक पाणी परवान्याची मुदत संपलेली असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने नेवासा तालुक्यातील अशा शेतकर्‍यांच्या पाणी उचलणार्‍या मोटारी, केबल व स्टार्टर जप्तीची व विनापरवाना पाणी उचलले म्हणून गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.

जायकवाडी धरणग्रस्त शेतकर्‍यांना 18 वर्षांचे पाणी परवाने देण्यात आले होते. सदर पाणी परवाने नूतनीकरण करून घेण्याची मुदत संपल्याची व नूतनीकरण करून घेण्याबाबत माहिती शेतकर्‍यांना देण्याचे काम जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे होते. असे असताना कोणतीही पूर्व सूचना न देता मोटारी जप्त करून शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम त्वरित थांबवून शेतकर्‍यांना परवाने नूतनीकरणासाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येऊन सर्व शेतकर्‍यांचे पाणी परवाने नूतनीकरण करून घ्यावे.

अनेक शेतकर्‍यांनी गेल्या काही दिवसापासून पाणी परवानगीचे नूतनीकरण करण्यासाठी ऑफिसमध्ये हेलपाटे मारले. परंतु अधिकारी नूतनीकरण बंद असल्याचे तसेच नवीन पाणी परवानगी सुध्दा बंद असल्याचे सांगत होते. परवानगी नुतनीकरणे, नवीन पाणी परवानगी मिळणे, शेतकर्‍यांवरील होणारी कारवाई थांबवण्यासाठी जायकवाडी लाभधारक पाणी परवानगी संघर्ष समिती व लाभधारक शेतकर्‍यांची दि. 11 रोजी सकाळी बैठक होईल व त्यानंतर वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल.

शेतकर्‍यांनी बैठकीस व मोर्चात सहभागी उहोण्याचे आवाहन अंबादास कोरडे, विठ्ठलराव लंघे, बाबा आरगडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, श्रीरंग हारदे, पुरुषोत्तम सर्जे, राजेंद्र मते, पिंटू शेळके, हरीभाऊ सुडके, भानुदास मते, शंकर शेडाळे, डॉ. अशोक ढगे, जगन्नाथ कोरडे, विठ्ठल परदेशी, नवनाथ पठाडे महाराज, नवनाथ साळुंके, दौलत गनगे, बंटी शिंदे, अशोक लबडे, सीताराम जाधव, दादासाहेब चिमणे, डॉ. किरण घुले, बाळासाहेब पाटील, शिवाजी मते, अशोक हारदे, गोविंद शेळके, दादासाहेब तनपुरे, ज्ञानदेव गारुळे, ज्ञानदेव लोखंडे, भाऊसाहेब शिंदे, इकबाल शेख, भगवान आगळे, महेश कोठारे, बाळासाहेब आगळे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com