श्रीरामपूर : दत्तनगरमध्ये करोनाचे संशयित दोन रुग्ण

श्रीरामपूर : दत्तनगरमध्ये करोनाचे संशयित दोन रुग्ण

तिघे क्वारंटाईन; तीन दिवस परिसर सील

टिळकनगर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुंबईहून आलेल्या पाच जणांपैकी दोन जणांना करोना सदृश्य लक्षणे आढळल्याने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दोघांना पुढील तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवत दोघांचे घशाचे स्त्राव नमुने पुण्याला पाठविले आहेत. त्यांना अहमदनगर येथेच क्वारंटाइन केले आहे. तर इतर तिघांना श्रीरामपूर येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रातोरात संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

करोनावर मात करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवून जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यातील दत्तनगर परिसरातील बरेच नागरिक मुंबई, पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यापैकी करोनाच्या भीतीने मुंबईहून एक कुटूंब मंगळवारी दत्तनगर परिसरात चक्क रिक्षात आले.

ग्रामस्थांच्या लक्षात येताच काहींनी सतर्कता दाखवीत ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. काही वेळातच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मुंबईहून आलेल्या या पाच जणांची तपासणी केली असता त्यापैकी दोन जणांना खोकला व ताप असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य विभागाने तत्परतेने दोघांना अहमदनगर येथे हलविले व लगेचच त्यांच्या घशाचे स्त्राव घेऊन पुण्याला पाठविले.

आज दुपारपर्यंत त्यांचे अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली. तर उर्वरित तिघांना श्रीरामपूर येथील डॉ. आंबेडकर वसतिगृह येथे क्वारंटाइन करण्यात आले. तसेच ज्यांच्या घरी मुंबईहून हे पाचही आले होते त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

दोघांना अहमदनगर येथे नेताच सोशल मीडियावर दत्तनगर येथे करोनाचा संसर्ग असलेला रुग्ण सापडल्याची काहींनी अफवा पसरवली. सोशल मीडियात वेगाने पसरणार्‍या अफवांमुळे एकूण वातावरण गोंधळाचे, संशयाचे, भीतीची होत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. करोनाबाबत कुणीही अफवा, खोटे वृत्त, माहिती पसरवू नये.

नागरिकांनी संयम बाळगत करोनाचा प्रकोप टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचे पालन करावे. असे आवाहन जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, जि.प. सदस्या आशाताई दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकलोळ, भीमराज बागुल, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर आदींनी केले आहे.

दरम्यान, या व्यक्तींनी प्रवास करण्याचा अथवा स्थलांतर करण्याबाबतचा परवाना न घेता प्रवास केला. व प्रवासा दरम्यान साथीचा रोग होऊ नये यासाठी काही खबरदारी न घेता आरोपी नं 1 ते 4 यांनी नालासोपारा मुंबई ते श्रीरामपूर असे रिक्षा (नं. एम.एच. 48 बी.एफ. 1253) हिच्यामध्ये प्रवास करुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 918/2020 भा. द. वि. कलम 188, 269 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर ओंकार कारखेले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com