मुंबईत झालेले मृत्यू निष्काळजीपणामुळे

विरोधी पक्षनेते दरेकर : करोना आटोक्यात आणण्यात सरकार शंभर टक्के अपयशी

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनामुळे मुंबईत जे मृत्यू झाले, ते केवळ निष्काळजीपणामुळे झालेले आहेत. रूग्णवाहिका न मिळणे, हॉस्पीटलमध्ये बेड न मिळणे, व्हेंटिलेटर नसणे आदी कारणांमुळे मृत्युंचे प्रमाण वाढले. त्यामुळे करोना आटोक्यात आणण्यात राज्य सरकार शंभर टक्के अपयशी ठरले आहे. एकीकडे केरळ तेथील जनतेला पॅकेज देत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे सरकार मात्र केंद्राकडून निधी काय मिळतो, याकडे डोळे लावून बसले आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

कोव्हिड-19, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि त्यावरील उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी दरेकर शनिवारी नगर दौर्‍यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे व शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, अ‍ॅड. युवराज पोटे, प्रसाद ढोकरीकर आदी उपस्थित होते.

दरेकर म्हणाले, आम्ही करोनावर राजकारण करत असल्याचा आरोप सरकार करत आहे. मात्र उपाययोजना आणि वस्तुस्थिती यातील तफावत निदर्शनास आणून देणे याला राजकारण कसे म्हणता येईल. नऊ मार्चपासून करोनाविरूद्ध लढाईसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना शिघ्र गतीने करणे आवश्यक असताना त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. आजही रोज मोठ्या प्रमाणात रूग्णांचा आकडा वाढत आहे. रूग्णांचा आकडा वाढू नये म्हणून सरसकट तपासणी करण्याचे सरकार टाळत आहे. सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे.

दरेकर म्हणाले, या सरकारमध्ये ताळमेळ नाही. सरकार आणि अधिकारी, सरकार आणि त्यातील पक्ष यांच्यात समन्वय नाही. राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवार हे सरकार आपल म्हणायला तयार नाहीत. विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. चक्रीवादळामुळे कोकण, मुंबईप्रमाणेच नगर, नाशिक जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले. त्याचाही आढावा घेण्यात आला. शेतकर्‍यांच्या बांधावर बि-बियाणे देण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात फक्त गावापर्यंत बियाणे आणि खते पोचविण्यात आले आहेत. बांधावर अद्याप कोणाला दिले नाहीत, असाही आरोप दरेकर यांनी केला.

… तर पुणे-मुंबईसारखी नगरमध्ये स्थिती
अहमदनगर जिल्ह्यात करोनाची परिस्थिती नियंत्रित असली तरी खबरदारी घेण्याची गरज आहे, अन्यथा येथेही मुंबई व पुण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारंटाईनची स्थिती योग्य पद्धतीने हाताळावी, अशा सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासनाला शनिवारी दिल्या. तसेच शेतकर्‍यांच्या बांधावर बि-बियाणे योग्य वेळेत पोहचू द्या व कापूस, हरभरा, मका, तूर आदी धान्याची खरेदी गतीने करण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *