चालू शैक्षणिक वर्षात पुन्हा शाळा सुरु न करण्याचे आदेश
Featured

चालू शैक्षणिक वर्षात पुन्हा शाळा सुरु न करण्याचे आदेश

Sarvmat Digital

संगमनेर (वार्ताहर)- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन वाढविण्यात आल्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा या शैक्षणिक वर्षात पुन्हा सुरू करण्यात येऊ नयेत अशा प्रकारचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने राज्यात 25 मार्च पासून पूर्णतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शाळा पासून तर वरिष्ठ महाविद्यालय पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आलेली आहेत. त्यातच मंगळवारी पंतप्रधान यांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्ष 2019-20 हे मे महिन्यात संपणार होते. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता 14 एप्रिल नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा शाळा सुरू करण्यात येऊ नयेत असे आदेश देण्यात आले आहे.

इयत्ता नववी व 11 वी च्या द्वितीय सत्राच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रथम सत्र परीक्षेत मधील गुण, चाचण्या, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापनाचे प्राप्त गुण याचा विचार करून विद्यार्थ्यांना वर्ग उन्नती द्यावयाची आहे. इयत्ता दहावीचा भूगोलाचा व कार्य शिक्षणाचा पेपर रद्द करण्यात आल्यानंतर राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या प्रचलित विहीत कार्यपद्धतीनुसार या विषयाच्या गुणाबाबत मंडळाने योग्य ती कार्यवाही करावी असेही आदेशित करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यामुळे दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका संचार बंदीच्या काळात शिक्षकांना तपासणीसाठी उपलब्ध करून देता येणे शक्य नाहीत. याबाबत संचारबंदी उठल्या नंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही शासनाने जाहीर केले आहे.

दहावी-बारावीचे निकाल लांबणार
राज्य शासनाने संचारबंदी च्या कालावधीत पेपर तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. सध्या राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे व राज्यात काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आल्यामुळे या कालावधीत पेपर तपासणीसाठी उपलब्ध होणार नाही. ही बाब लक्षात घेता 3 मे पर्यंत पेपर उपलब्ध होणार नसल्यामुळे त्यानंतर पेपर तपासणी व त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी मिळणारा कालावधी लक्षात घेता दहावी-बारावीचे निकाल लांबणार आहेत. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होत असतो, तर दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस टप्प्यापर्यंत जाहीर होतो. मात्र यावर्षी पेपर तपासणीची प्रक्रिया मे अखेर चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच दहावी-बारावीचे निकाल लांबतील. त्याचा विपरीत परिणाम पुढील शैक्षणिक वर्षावरती होईल, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com