Friday, April 26, 2024
Homeनगरविचित्र हवामानाने पिके धोक्यात तर शेतकरी गोत्यात

विचित्र हवामानाने पिके धोक्यात तर शेतकरी गोत्यात

रब्बीच्या पिकांवर परिणाम; ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस अन् कडक उन्हाळा; ज्वारी गेली कोमात

देवळाली प्रवरा – दुष्काळानंतर अतिवृष्टी आणि आता विचित्र हवामान यामुळे बळीराजा निसर्गाच्या द्रुष्टचक्रात अडकला असून आगीतून निघून फुपाट्यात पडल्यासारखी त्याची गत झाली आहे. विचित्र हवामानामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आल्याने शेतकरी गोत्यात आला आहे. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि रखरखत्या उन्हामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यंदा राहुरी तालुक्यात ज्वारीची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत वाढली होती. मात्र, ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याच्या हंगामात ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे ताट काळे पडले असून ज्वारीचे यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी पडलेला भीषण दुष्काळ, यानंतर झालेली अतिवृष्टी, यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने बळीराजा कामाला लागला. काळ्यामातीत रात्रंदिवस खपून कांदा, गहू, ऊस, मका, घास आदी चारा पिकांसह पिके उभी केली.

काळी आई मदतीला धावून आली. शिवार हिरवेगार दिसू लागले. पीक जोमात डोलू लागलं. यंदा चांगलं भरघोस पीक निघून दुष्काळाचा व अतिवृष्टीचा वचपा निघून सोन्याचे दिस येतील, या आशेवर तो जगत होता. आपल्या मुलाबाळांचा लग्नाचा बार आवंदा धुमधडाक्यात उडून देऊ. मागील वर्षी दुष्काळाने लग्न करता आले नाही. या तंद्रीत तो असताना निसर्गाची त्यावर वक्रदृष्टी झाली.

शेतशिवाराला जणू कोणाचीतरी नजर लागली. जोमात असलेली पिके कोमेजू लागली. कारण विचित्र हवामानाचा पिकांवर विपरित परिणाम होऊ लागला. कधी अती थंडी तर कधी थंडीच नाही. कधी धूक तर कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हं आणि सर्वांवर कळस म्हणजे ठिकठिकाणी झालेला अवकाळी पाऊस! निसर्ग इतका बदलला की सध्या हिवाळा आहे, उन्हाळा आहे की पावसाळा? हे समजेनासे झाले. याचा विपरित परिणाम पिकांवर झाला. पिकांची वाढ खुंटली. रंग बदलला, तजेला निघून गेला, गहू पिकावर तांबेरा व काळा मावा पडला. कांद्यावर करपा पडला. उसावर खोडकीडा पडला. घासावर मावा, तुडतुडे पडले. आंब्याचा बहर गळाला.

फळबागा संकटात सापडल्या. ही कीड हटविण्यासाठी महागडी औषध फवारणी सुरू झाली. पण सततच्या बदलत्या हवामानामुळे दर आठ-दहा दिवसाला महागड्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. पीक निघण्याअगोदर भरमसाट खर्च होत आहे.

पीक निघाल्यावर त्याला नेमका कसा भाव राहील? किती भाव राहील? हे काही बळीराजाच्या हातात नाही. कारण पिकविणं हेच फक्त त्याच्या हातात आहे. त्याच्या मालाची किंमत आजवर दुसराच ठरवीत आला आहे. इतकं दिव्य करून देखील उत्पन्न चांगलं निघालं आणि बाजारात आवक वाढली की, भाव पडणार हाती काही सापडणार नाही, हे देखील ठरलेलं. त्यामुळे यंदा बळीराजा निसर्गाच्या फेर्‍यात अडकला आहे. यातून बाहेर पडणे त्याला अवघड झाले आहे.

भीषण दुष्काळानंतर झालेली अतिवृष्टी याचा कृषिसेवा दुकानदारांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. किटकनाशक, तणनाशक, खते व बी-बियाणे देखील पडून होते. पाऊस भरपूर झाला, धरणं भरली आणि ही परिस्थिती पूर्णपणे बदलली. दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका यंदा भरून निघाला. सर्वत्र पिके उभी राहिल्याने प्रचंड प्रमाणात खते, बी-बियाणे, कीटकनाशक व तणनाशकाची विक्री सुरू झाली. अनेक ठिकाणी तर तणनाशकाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांची किटकनाशकाची विक्री होत आहे. मात्र, यामुळे बळीराजा आणखी पाताळात जात आहे. याचे सोयरंसुतक कोणालाही नाही. एका दाण्याचे हजार दाणे करणारा जगाचा पोशिंदा विचित्र हवामानामुळे पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या