पीककर्जाअभावी खरीप हंगामावर पाणी फिरण्याची वेळ
Featured

पीककर्जाअभावी खरीप हंगामावर पाणी फिरण्याची वेळ

Sarvmat Digital

शेतकरी नवीन पीककर्जाच्या प्रतीक्षेत

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- महाआघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर करून तीन महिने उलटून गेले आहेत. तरी देखील अद्यापपर्यंत राहुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमधील शेकडो शेतकर्‍यांची खाती कर्जमुक्त झालेली नाहीत. त्यामुळे या शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज मिळणार केव्हा? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुळा आणि भंडारदरा या दोन्ही धरणांचे पाणी असलेला राहुरी हा बागायती तालुका! या तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रमुख पीक म्हणजे ऊस! उसाचा पट्टा म्हणून तालुक्याची जुनी ओळख आहे. अर्थात ऊस पिकासाठी कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या सुध्दा जास्तच आहे. बहुतांश शेतकरी सहकारी सोसायट्यांकडून उसासाठी पीककर्ज घेतात. तर काही शेतकरी सर्वात मोठी बँक म्हणून व वेळेवर कर्ज मिळते म्हणून स्टेट बँकेकडून कर्ज घेतात. दरवर्षी ऊस गेल्यानंतर मागील कर्ज फेडायचे व पुन्हा नवीन कर्ज घेऊन ऊस शेती पिकवायची, असे चक्र सुरू होते.

परंतु सलग तीन वर्षे पडलेला दुष्काळ व त्यानंतरची अतिवृष्टी यामुळे हे चक्र बंद पडले. आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार? अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली. पीककर्ज थकत गेले. अशा परिस्थितीमध्ये महाआघाडी सरकारने थकीत शेतकर्‍यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली व दोन लाखांपर्यंत कर्ज असणार्‍या सरसकट शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याप्रमाणे सुरूवातीला तालुक्यातील 17 हजार 100 शेतकर्‍यांच्या नावाची यादी आली. कर्जदार शेतकर्‍यांचा अंगठ्याचा ठसा घेऊन त्याला कर्जमाफी देण्यात आली. ही प्रक्रिया महिनाभर सुरू राहिली. त्यानंतर उर्वरित सुमारे दोन हजार शेतकर्‍यांच्या यादीला करोनाचे ग्रहण लागले. करोनामुळे या यादीला मोठा विलंब लागत आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. यंदा धरणाची पाणी पातळी चांगली राहिल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी सुरू केल्या आहेत. तर अनेक ठिकाणी लागवड होऊन उसाचे पीक दोन ते तीन महिन्यांचे झाले आहे. आता या पिकांना मोठ्या प्रमाणात खताची व मेहनतीची गरज आहे. परंतु खिशात दमडीही शिल्लक राहिली नसल्याने पिकांना खते आणायची कशी? पुढील मेहनत करायची कशी? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकर्‍यांना पडला आहे.

कर्जमाफी मिळणार, या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी उधार उसनवारी करून व खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन उसाची पिके उभी केली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत कर्जमाफी न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन राहिलेल्या शेतकर्‍यांना तातडीने कर्जमाफी देऊन उसासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

सहाय्यक निबंधक खंडेराय यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, करोनामुळे मंत्रालयात यावर काम करणार्‍या अधिकार्‍यांची उपस्थिती कमी असल्याने याला वेळ लागत आहे. हळूहळू यादीतील सर्व नावे येतील.सहकारी सोसायट्यांमधील सर्व थकबाकीदारांना कर्जमाफी मिळाली असून जिल्हा सहकारी बँकेने त्यांना नवीन पीककर्ज देखील वाटप केले आहे.

याबाबत स्टेट बँकेत चौकशी केली असता त्यांनी सांगितले, शासनाच्या नियमानुसार दोन लाखांपर्यंत पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची यादी आम्ही वेळेत कळविली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 105 लोकांची नावे आली आहेत. दुसर्‍या यादीत सात लोकांची नावे आली आहेत. एकूण 535 लोकांची यादी आहे. यादीत नाव आल्यानंतर नवीन पीककर्ज दिले जाईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com