Saturday, April 27, 2024
Homeनगरपिकांसाठी आढळाचे पहिले आवर्तन सुरू

पिकांसाठी आढळाचे पहिले आवर्तन सुरू

लाभक्षेत्राला उन्हाळ्यातही मिळणार दोन किंवा तीन आवर्तने

वीरगाव (वार्ताहर) – रब्बी हंगाम आणि शेतातील सर्व उभ्या पिकांसाठी अकोले तालुक्यातील देवठाणच्या आढळा धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात आले. मागील वर्षांत झालेल्या अतिवृष्टीमुळे लाभक्षेत्राचा भूजलस्तर अद्यापही बर्‍यापैकी असल्याने पाणी मागणी क्षेत्रात मोठी घट झाली. या आवर्तनानंतर उन्हाळ्यासाठीही पाणी शिल्लक राहणार असल्याने लाभक्षेत्राला यावर्षी उन्हाच्या झळा कमी जाणवतील.

- Advertisement -

बुधवार दिनांक 5 फेब्रुवारीला सकाळी 10 वा.उजव्या आणि डाव्या कालव्यातून अनुक्रमे 20 आणि 30 क्युसेकने पाण्याचे वहन सुरू आहे. रब्बीच्या गहू, हरभरा, उन्हाळी कांदा आणि इतर सर्व उभ्या पिकांसाठी आवर्तनाचा लाभ होईल.

1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या आढळा धरणात आवर्तन सोडतेवेळी 995 दलघफू.पाणीसाठा होता.अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 15 गावांचे 3914 हेक्टर क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे.भूजलस्तर बर्‍यापैकी टिकून राहिल्याने पाणीमागणीत मोठी घट झाली. उजव्या आणि डाव्या कालव्यांतर्गत 110 आणि 300 मिळून 410 हेक्टर क्षेत्राची आजपर्यंत मागणी झाली.

रब्बीचे हे एकमेव आवर्तन असून उर्वरीत पाण्यात उन्हाळ्यात दोन किंवा तीन आवर्तने होऊ शकतात.त्याचा मोठा लाभ ऐन उन्हाळ्यात लाभक्षेत्राला होईल. सध्याचे आवर्तन 15 दिवस चालण्याचा अंदाज असून यात 125 दलघफू पाणी खर्च होण्याचा संभव आहे.अनेक वर्षे दुष्काळाच्या झळांनी तापलेल्या आढळा लाभक्षेत्राला यावर्षी उन्हाळ्यातही आवर्तने मिळणार असून दरवर्षी होणारे जनावरांचे हाल, पिण्याच्या पाण्याचे हाल नक्की थांबतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या