पिकांच्या काढणीला कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा कोलदांडा

पिकांच्या काढणीला कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा कोलदांडा

रस्ते अडविल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण; शेतमजुरांना धास्ती

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. संचारबंदी असल्याने नगरपरिषद हद्दीतील सर्व रस्ते ब़ंद करण्यात आले आहेत. यामुळे शेतीच्या कामासाठी मजूर यायला तयार नसल्याने गहू, कांदे, हरभरा आदी पिकांची काढणी खोळंबली आहे.

सध्या परिसरात गहू, हरभरा, कांदा या पिकांचा काढणी हंगाम सुरू आहे. ही पिके पक्व झाली आहेत. आता जर पीक काढले नाहीतर पीक हातचे जाण्याचा धोका आहे. मागच्या आठवड्यात अवकाळी पावसाने ही पिके भुईसपाट केली आहेत. त्यामुळे आता मजुरांशिवायही पिके काढणे शक्य नाही. यंदा गव्हाचे पीक जोमदार आले आहे. सरासरी उत्पन्नही चांगले आहे. परंतु अवकाळी पावसाने गहू भुईसपाट झाल्याने तो हार्वेस्टरने काढता येत नाही.

काढला तरी त्यात माती जास्त येते व एकरी दोन ते तीन पोत्याचे नुकसान होते. तरी देखील धाडस करून हे नुकसान सोसूनही शेतकरी हार्वेस्टरने गहू काढत आहेत. मात्र, काही ठिकाणी रस्त्याच्या अडचणीमुळे हार्वेस्टर शेतात जात नाही. तर काही आडदांड मंडळी गरीब शेतकर्‍यांचा रस्ता अडवित आहेत. त्यामुळे हार्वेस्टर शेतात घालण्यास मशिनवाले धजत नाहीत.

एकीकडे हार्वेस्टर जाऊ दिले जात नाही तर दुसरीकडे मजूर येऊ दिले जात नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक डोळ्यादेखत जाण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा व हरभरा ही पिके हार्वेस्टरने निघत नसल्याने ती मजुराकडूनच काढून घ्यावी लागतात. परंतु सध्या अनेक ठिकाणी चौक्या, पहारे असल्याने मारहाणीच्या धास्तीने मजूर यायला तयार नाहीत.

त्यातच अफवांचे पीक अमाप असल्याने परिस्थिती अवघड होत चालली आहे. गहू सोंगणीसाठी मजुरांनी एकरी सात ते आठ हजाराचे दर ठेवल्याने शेतीचे आर्थिक बजेटच बिघडले आहे. मात्र, यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. ही पिके जर हातातून गेली तर वर्षभर खायचे काय? आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून जे कोणी शेतकर्‍यांचे हार्वेस्टर अडवित असतील व शासकीय रस्त्याला स्वतःचा खासगी रस्ता समजत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी व शेतीच्या कामासाठी मजुरांना यातून वगळण्यात यावे. या बाबतच्या चौकशीच्या सूचना तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांना द्याव्यात, जेणेकरून शेतकर्‍यांचे शेतीपिकाचे होणारे नुकसान टळले जाईल, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com