आरोपींना मदत केल्यावरून चौघेजण ताब्यात
Featured

आरोपींना मदत केल्यावरून चौघेजण ताब्यात

Sarvmat Digital

कर्जत येथील उपकारागृहामधून आरोपी पळून गेल्याचे प्रकरण

कर्जत (वार्ताहर)- कर्जत येथील उपकारागृहामधून गंभीर गुन्ह्यांतील पाच आरोपी पळून गेले होते. पळून जाण्यास त्यांना मदत केल्या प्रकरणी पोलिसांनी आणखी चौघांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्यावर भादवि कलम 224 प्रमाणे कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

निलंबित पोलीस कर्मचारी दत्तात्रय गोरख भोसले (रा. मंगळवेढा जि. सोलापूर), अनिल नवनाथ माने (रा. माहिजळगाव ता. कर्जत), शिवानंद लक्ष्मण पोटरे (रा.कर्जत), सचिन नवनाथ राऊत (रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, ता. हवेली जि. पुणे). त्यांना आरोपी करून ताब्यात घेण्यात आले आहे.

खून, बलात्कार, रस्तालूट आणि शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांतील पाच आरोपींनी गेल्या 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उपकारागृह कर्जत येथील क्रमांक चार या कोठडीचे प्लायवूड कापले. नंतर त्यावरील गज कापले. नंतर कौले उचकटून पलायन केले होते. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. 12 फेब्रुवारी रोजी यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

यामध्ये दोन आरोपी पुणे येथे व एक कर्जत तालुक्यातील माळंगी येथे छापा टाकून पकडला आहे. मात्र अद्याप दोन आरोपी फरार आहेत. त्यांचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.

पळून गेलेल्यापैकी जे तीन आरोपी पकडले आहेत, त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीमध्ये या पळून जाण्याचा कटाचा मुख्य सूत्रधार हा निलंबित पोलीस दत्तात्रय गोरख भोसले हाच असल्याचे तिन्ही आरोपीनी सांगितले. हाच प्रमुख मास्टरमाइंड होता. त्यानेच कसे पळून जायचे याची योजना तयार करून दिली आणि त्या नुसार आम्ही जेल तोडून पळून गेलो असे सांगितले असल्याचे तपासात कबूल केले आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आरोपींना पळून जाण्यासाठी कट रचणे, बाहेरून साहित्य पुरविणे, आर्थिक मदत करणे, मोबाईल देणे, तसेच संपर्क ठेवणे असे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे चार जणांना आरोपी पलायन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यात अनिल नवनाथ माने (रा. माहिजळगाव ता. कर्जत) यास साहित्य आत देणे, सचिन नवनाथ राऊत (रा. गोपाळपट्टी, मांजरी बु. ता. हवेली जि. पुणे) यास पलायन केलेल्या आरोपींना निवारा देऊन आर्थिक मदत करणे, पळालेल्या आरोपींच्या बराकीत पळताना असलेला सहावा आरोपी एका खुनाच्या गुन्ह्यात न्यायलयीन कोठडीत असलेला निलंबित पोलीस दत्तात्रय गोरख भोसले (रा. मंगळवेढा जि. सोलापूर) यास आरोपींना पळून जाण्यासाठी कट आखल्याबद्दल दोषी धरण्यात आले आहे.

तर शिवानंद लक्ष्मण पोटरे (रा.कर्जत) यास आरोपींना भत्ता देताना पोलिसांची नजर चुकवून आत काही वस्तू देणे, मोबाईलवर संपर्क असणे, आदी आरोपांखाली ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायलयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com