नगर: एमआयडीसीत चोरी करणारी टोळी जेरबंद
Featured

नगर: एमआयडीसीत चोरी करणारी टोळी जेरबंद

Sarvmat Digital

एलसीबी पोलिसांची कारवाई, उस्मानाबाद जिल्ह्यात पकडले

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर एमआयडीसीत चोर्‍या करणारी टोळी पकडण्यात एलसीबी पोलिसांना यश मिळाले आहे. उस्मानाबाद येथे जावून नगर पोलिसांनी 15 जणांच्या टोळीतील तिघांना अटक केली. या टोळीकडून चोरीसाठी वापरलेला ट्रक आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

बिभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे, सुनील नाना काळे (सर्व रा. कळंब, उस्मानाबाद) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी टोळीतील अन्य 12 जणांची नावे पोलिसांना सांगितली. तात्या रमेश काळे, पिल्ल्या रवींद्र काळे, सुभाष भास्कर काळे, रमेश लघमन काळे, सुनील कालीदास शिंदे, दादा ऊर्फ राजेंद्र छगन काळे, बंड्या ऊर्फ शहाजी बाबुराव काळे, शाभ बिभीषण काळे, बाबुशा भिमराज काळे, बबन बापू शिंदे, सुधाकर श्रावण भगत आणि भागवत ऊर्फ भाग्या बाप्पा काळे (सर्व रा. कळंब, उस्मानाबाद) अशी पसार झालेल्या अन्य आरोपींची नावे आहेत.

नगर एमआयडीसीत 6 डिसेंबरला या टोळीने टायरचे गोडावून फोडून 17 लाख 98 हजार रुपये किंमतीचे ट्रक आणि मोटारसायकलच्या टायरची चोरी केली. चोरी केलेले टायर जवळच असलेल्या नदीपात्रातील झुडूपात लपून ठेवले. 96 हजार रुपये किंमतीचे सहा टायर मात्र सोबत घेऊन गेले. एमआरएफ टायर गोडाऊनचे व्यवस्थापक शिवचरणदास दिनबंधूदास यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील टोळीने नगरमध्ये येवून चोरी केल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना खबर्‍याकडून मिळाले. त्यानुसार पवार यांनी पोलिसांचे पथक तयार करून त्यांना कळंब येथे पाठविले. पोलिसांच्या पथकाने अगोदर बिभीषण काळे यास पकडले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करतेवेळी साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. त्यानंतर एलसीबी पोलिसांनी तिघांना अटक करत त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

कर्नाटकसह सहा गुन्ह्यांची कबुली
या टोळीने कर्नाटकातील उडपी, जालना, उस्मानाबाद, अमरावती, लातूर येथे दरोडा, जबरी चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बिभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे आणि सुनील नाना काळे हे तिघे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. नगरच्या गुन्ह्यासोबतच एलसीबी पोलिसांनी लातूरचे दोन, अमरावती,उस्माबाद, कर्नाटक आणि जालना येथील प्रत्येकी एक असे सहा गुन्हे उघडकीस आणले.

Deshdoot
www.deshdoot.com