पत्नीच्या मदतीने मजुर महिलेवर अत्याचार
Featured

पत्नीच्या मदतीने मजुर महिलेवर अत्याचार

Sarvmat Digital

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)– श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील एका व्यक्तीने शेतात काम करण्यास आलेल्या महिलेवर आपल्या पत्नीच्या मदतीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दोन मुली असल्याने मुलासाठी पती हा पत्नीला वारंवार दुसर्‍या लग्नाची भीती दाखवत होता. यातून बचाव करण्यासाठी पत्नीने शेतात कामावर येणार्‍या एका महिलेला पतीबरोबर मैत्री करण्याचा सल्ला दिला आणि दोघांच्या संगनमताने ती महिला या पतीची शिकार झाली. याबाबत पीडित महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील 27 वर्षीय महिला आपल्या पती सोबत सासरी नांदत असताना उपजीविकेसाठी गावातील महिलांबरोबर सुमारे पाच वर्षांपूर्वी लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी बाबा छत्रे याच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या असता, बाबा छत्रे याने पत्नीच्या संगनमताने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनंतर नमूद प्रकरण उघड झाले आहे.

बाबा छत्रे याला दोन मुली असल्याने मुलासाठी तो सतत त्याच्या पत्नीला दुसरे लग्न करण्याची धमकी देत असे. यातून त्याची पत्नी मानसिक तणावात होती. याबाबत बाबाच्या पत्नीने या पीडित महिलेला हकीगत सांगत नवर्‍याशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. त्याच्यासोबत बोलत जा, फोन करत जा, असेही सांगितले. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे सन 2018 मध्ये पारगाव सुद्रिक येथील महिलांसोबत पीडित महिला बाबाच्या शेतावर कामानिमित्त गेली. सोबत आलेल्या महिलांना बाबाच्या पत्नीने जाणिवपूर्वक दुसर्‍या शेतात कामासाठी नेले.

शेतात फुटलेल्या पाईपचे काम करण्यासाठी पती बरोबर तिला पाठवले. मजूर महिला एकटी पाहून पतीने पीडिते सोबत अश्लील चाळे केले. पीडितेने विरोध केला. मला एक लहान मुलगी असल्याचे सांगितले. तरी बाबाने तिचे काही ऐकून न घेता जबरदस्तीने अत्याचार केला. बदनामी होईल म्हणून हे प्रकरण कोणाला न सांगता. महिलेने कामावर जाणे सोडून दिले. कामावर येत नसल्याने त्या महिलेला बाबाने वारंवार फोन केले व झालेला सर्व प्रकार घरच्यांना सांगत तुझी बदनामी करून संसाराचे वाटोळे करेल, अशी धमकी दिली.

भीतीपोटी एक महिन्यानंतर पुन्हा ही महिला बाबाच्या रानात कामाला गेली.तेव्हा बाबाने पुन्हा तिच्याबरोबर जबरदस्ती करीत अत्याचार केला. यानंतर एक वर्ष होऊन गेले. ही महिला बाबाच्या शेतात कामानिमित्त गेली नाही. मात्र, 2 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी साडेचार वाजता बाबा छत्रे थेट तिच्या घरी पारगाव सुद्रिक येथे पोहोचला. त्याने या महिलेला मला फोन करत जा, तू मला आवडतेस, तुझ्या नवर्‍याने तुला सांभाळले नाही, तर मी तुला सांभाळेन.

नाहीतर तुझ्या दोन्ही मुलींना मारून टाकीन व नवर्‍याचे अपहरण करील, अशी धमकी दिल्याने पीडित महिलेने बाबा छत्रे व त्याच्या पत्नीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यावरून बाबा छत्रे व त्याची पत्नी यांच्यावर भादंवि कलम 376 व 109 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com