गाडीतील गोमांसाला फुटले पाय, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?
Featured

गाडीतील गोमांसाला फुटले पाय, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?

Sarvmat Digital

मांस व रक्ताचे डाग असलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रविवारी रात्री संगमनेर रोडवरून गोमांसाची वाहतूक करणारी गाडी नागरिकांनी पकडली. परंतु काही वेळातच सदर गाडीमधील गोमांस गायब झाले. फक्त बर्फाचे तुकडे, रक्त व काही प्रमाणात मांस असलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. नागरिकांनी गाडी पकडल्यानंतर बर्‍याच वेळानंतर पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होत गोमांस वाहतूक करणारी गाडी ताब्यात घेतली. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीच पोलिसांच्या कारवाईवर संशय उपस्थित केला आहे.

शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात श्रीसाईबाबा मंदिराजवळ काल रात्री 7.30 वाजेच्या सुमारास गोमांस वाहतूक करणार्‍या एक पांढर्‍या रंगाचा पिकअप नागरिकांनी पकडला. त्यामध्ये गोमांस होते. मात्र, लगेचच गाडी चालकाने फोन लावला आणि गोवंश कत्तल करणारे काही व्यावसायिक गाडीजवळ जमा झाले. बर्‍याच वेळाने पोलीसही घटनास्थळी आले. तेवढ्या वेळात गाडीच्या मागील ताडपत्रीच्या दोर्‍या कापून त्यातील गोमांस दुसर्‍या गाडीत गायब करण्यात आले.

मात्र, थेट पोलीस निरीक्षक बहिरट व डिवायएसपी यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केल्याने तीन तासांनंतर पकडलेली पांढरी गाडी शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आली. तेव्हा तिच्यात अनेक बर्फाचे तुकडे, रक्ताचे डाग दिसून आले. त्याचे फोटो नागरिकांनी काढले व समाजमाध्यमांवर व्हायरल केले. पोलिसांनी कारवाईस उशिर केल्याने गोमांस गायब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी गुन्हे करणार्‍यांनाच पाठिशी घातल्यास सामाजिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

त्यामुळे ही गाडी कोणाची? तिच्यातील गोमांस कुणी पळविले? कोणाच्या सांगण्यावरून पळविले? तसेच नंबर खरा आहे का? आरटीओचे पासिंग आहे का? याची चौकशी केल्यास गायब केलेले गोमांस व आरोपी समोर येऊ शकतात. मात्र त्यासाठी प्रामाणिक जबाबदारी बजावण्याची भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे.

अन्यथा श्रीरामपुरातील सुरू असलेले बेकायदेशीर गोवंश जनावरांची कत्तल करणार्‍या टोळीचे गुन्हे वाढतच जातील, याला जबाबदार कोण? याचाही शोध वरिष्ठांनी घेतल्यास त्यांना धक्कादायक माहिती मिळेल.

बिफ बंद तर ‘त्या’ भागातील हॉटेल सुरू कसे
जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. तसा कायदा देखील करण्यात आला आहे. परंतु तरीही शहरातून मोठ्या प्रमाणात बिफ दुसरीकडे पुरविले जाते. शासनाने बिफवर बंदी आणली आहे. परंतु शहरातील ‘त्या’ भागातील बिफ हॉटेल सर्रासपणे सुरू आहेत. ते कुणाच्या आशिर्वादाने असा प्रश्न हिंदु रक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी उपस्थित केला आहे.

त्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास
जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केल्यानंतर त्यांच्या पोटात निघणारे आतडे, कातडे दररोज दोन-तीन ट्रॅक्टरमधून पहाटेच्यावेळी अंधारात खबडीत आणून टाकले जातात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास होत आहे.

पोलीस कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने याप्रकरणी कारवाई केली जात नाही. महिन्यातून अनेकवेळा गोमांस वाहतूक करणारी वाहने नागरिकांकडून पकडली जातात. परंतु प्रशासनाकडून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही.
– कुणाल करंडे.

Deshdoot
www.deshdoot.com