पाचुंदा येथे शेतीच्या वादातून कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण
Featured

पाचुंदा येथे शेतीच्या वादातून कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण

Sarvmat Digital

एकाचे बोट फ्रॅक्चर; पाच जणांवर दंगलीसह विविध गुन्हे दाखल

नेवासा (का. प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे शेतजमिनीच्या वादातून कुर्‍हाडीचा दांडा व लाकडी दांड्याने तिघांना मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमीच्या जबाबावरुन नेवासा पोलीस ठाण्यात पाच जणांवर दंगलीसह विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत दिवाकर मच्छिंद्र वाघमारे (वय 28) धंदा-शिक्षण रा. निंबेनांदूर ता. शेवगाव यांनी जबाबात म्हटले की, मी वरील ठिकाणी माझी आई, बहिण व वडील असे एकत्र राहतो. माझे शेजारीचा माझा चुलता जालिंदर दत्तू वाघमारे हा त्याच्या कुटुंबासह राहतो. आमचे व त्यांचेत जमिनीवरुन वाद चालू आहेत. 26 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आमच्या घरासमोर मी व माझे आई वडील असे घरासमोरील अंगणात बसलो असताना तयवेळी जालिंदर दत्तू वाघमारे, मंगल जालिंदर वाघमारे, महेश जालिंदर वाघमारे, स्वाती जालिंदर वाघमारे सर्व रा. पाचुंद ता. नेवासा हे सर्व आमचेजवळ आले व आम्हाला म्हणाले की, तुम्ही शेत गट नं. 101 व तुम्ही राहता त्या घरातून निघून जा. शेत गट नं. 101 मध्ये तुम्ही यायचे नाही ते आमचे आहे. यावर मी व माझे आई वडील असे त्यांना समजावून सांगितले त्याचा त्यांना राग येऊन त्यांनी आम्हाला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.

महेश जालिंदर वाघमारे याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीच्या दांड्याने माझ्या डोक्यावर मारुन दुखापत केली. जालिंदर दत्तू वाघमारे याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारुन उजव्या बोटाल फ्रॅक्चर झाले आहे. इतरांनी मुका मार दिला आहे.
भांडण सोडवासोडव करत असताना माझी आई हिराबाई मच्छिंद्र वाघमारे व वडील मच्छिंद्र दत्तू वाघमारे यांनाही काठीने मारुन दुखापत केली तर बहीण दीपाली हिला मुका मार दिला. हे घर व शेती सोडून जा अन्यथा तलवारीने कापून टाकू अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी जालिंदर दत्तू वाघमारे, मंगल जालिंदर वाघमारे, महेश जालिंदर वाघमारे, हरिष जालिंदर वाघमारे, गणेश जालिंदर वाघमारे व स्वाती जालिंदर वाघमारे या पाच जणांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 60/2020 भारतीय दंड विधान कलम 326, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार बी. जी. पवार करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com