Wednesday, April 24, 2024
Homeनगरट्रकचालकाचा खून करणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

ट्रकचालकाचा खून करणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

आठ दिवसांत तपास मार्गी : 73 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – निंबळक येथील नवनाथ गोरख वलवे (वय-32) यांच्याजवळील दूध पावडरच्या गोण्यांनी भरलेला ट्रक गायब करत वलवे यांची हत्या करणार्‍या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर, पुणे, मुंबई येथून जेरबंद केले आहे.

- Advertisement -

त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचा ट्रक, 53 लाख 34 हजार 200 रुपये किमतीची दूध पावडर असा 73 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोळीचा म्होरक्या दिलीप अशोक मुंढे (वय-33 रा. सोनहिवरा ता. परळी जि. बीड हल्ली रा. इंद्रायणीनगर, भोसरी ता. हवेली जि. पुणे), रोहित उर्फ दाद्या शहाजी बनसोडे (वय-20 रा. शिरसागरनगर, ढवळस ता. माढा जि. सोलापूर), महेश मोहन शिंदे (वय- 21 रा. जगदाळे नगर, कुर्डुवाडी ता. माढा जि. सोलापूर), ज्ञानेश्वर उर्फ सोनू विष्णू राऊत (वय-22), रविराज ज्ञानदेव बनसोडे (वय-22 दोघे रा. ढवळस ता. माढा जि. सोलापूर), शिवाजी धनाजी पाटील (वय-33 रा. उजनी जि. सोलापूर), शाहीद इस्माईल शेख (वय-36 रा. वडजी ता. वाशी जि. उस्मानाबाद, हल्ली रा. मोशी ता. हवेली जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना बुधवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

30 डिसेंबरला नवनाथ गोरख वलवे याने त्याच्या मालकीच्या ट्रकमध्ये (एमएच-16 एवाय-6769) इंदापूर (जि. पुणे) येथील सोनाई डेअरी येथून 74 लाख 50 हजार रूपये किमतीची दूध पावडर भरली. कटक (ओरीसा) येथे दूध पावडर खाली करण्यासाठी वलवे इंदापूर येथून निघाले. दूध पावडर विषयी अत्यंत बारीक माहिती असलेला टोळीचा मुख्य म्होरक्या दिलीप मुंढे व त्याच्या अन्य साथीदारांनी इंदापूर येथून वलवे यांच्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. त्याला नेवासे तालुक्यातील खडका टोल नाक्यावर आरोपींनी अडवून एका चारचाकी वाहनात घातले. त्याच्याजवळील दूध पावडरने भरलेला ट्रक गायब केला.

वलवे याचा खून करून दूध पावडर चोरण्याचा आरोपी दिलीप मुंढे याच्या टोळीचा डाव होता. ठरल्या प्रमाणे आरोपींनी वलवे याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून प्रेत निंबळक बायपास रोडवरील एका शेतात टाकून दिले. वलवे याचा खून करून मारून टाकल्याचे 31 डिसेंबरला लक्षात आले. याप्रकरणी मृत नवनाथ यांचे वडील गोरख मारुती वलवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, रवींद्र कर्डिले, आण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, रवी सोनटक्के, संतोष लोंढे, सचिन आडबल, योगेश सातपुते, रणजित जाधव, विजय ठोंबरे, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, सूरज वांबळे, बाळासाहेब भोपळे, सचिन कोळेकर, भरत बुधंवत यांनी मिळून गुन्ह्याचा तपास केला. नगर-औरंगाबाद, नगर-पुणे, शिक्रापूर-चाकण, नगर-दौंड या रोडवरील टोल नाके, पेट्रोल पंप, हॉटेल ढाबे यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले.

सोनई डेअरी यांनी दिलेल्या माहितीवरून व सीसीटीव्ही फुटजेवरून तपास केला असता, टोळीचा म्होरक्या दिलीप मुंढे याने साथीदारांचा मदतीने गुन्हा केला असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले. पोलिसांनी मुंढे याला भोसरी (ता. हवेली जि. पुणे) येथून ताब्यात घेतले. मुंढे याला विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ पथके नेमून सोलापूर, पुणे, मुंबई येथून इतर आरोपींना अटक केली. ट्रक व दूध पावडर विषयी विचारणा केली असता ट्रक व दूध पावडर शाहीद शेख याला विकली असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.

पोलसांनी मोशी (जि. पुणे) येथून ट्रक व दूध पावडर हस्तगत केली. गुन्हा नियोजनबद्ध कट करून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात लावण्यात आलेले 302 कलम रद्द करून भादवि कलम 396, 120 (ब), 341, 412 ही कलमे लावण्यात आले आहे. दरम्यान या तपासामुळे स्थानिक गुन्हे शाखेला प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.

टोळीचा म्होरक्या मुंढेचा कट
दूध धंद्याविषयीचा अभ्यास असलेला टोळीचा म्होरक्या दिलीप मुंढे याला दूध पावडरची निर्मिती करणार्‍या कारखान्याची सर्व माहिती आहे. दूध पावडरला दर चांगला आहे. यामुळे पैसाही चांगला मिळेल. यातूनच अन्य साथीदारांच्या मदतीने मुंढे याने गुन्ह्याचा कट रचला. मुंढे याने यापूर्वी पुणे येथील एका दूध पावडरचे गोदाम फोडून कोटी रूपयांची दूध पावडर लंपास केली होती. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सोनहिवरा, आंबेजोगाई, परळी (जि. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या