Thursday, April 25, 2024
Homeनगरपाच सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची कारवाई

पाच सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची कारवाई

 श्रीरामपूरच्या दोन तर संगमनेर तालुक्यातील एकाचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी) –  जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शिक्कामोर्तब करून पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. प्रशांत उर्फ पांड्या साईनाथ लेकुरवाळे (रा. निमगाव खैरी ता. श्रीरामपूर), गणेश उर्फ सोमनाथ बापूसाहेब हाळनोर (रा. फत्त्याबाद ता. श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (रा. धांदरफळ ता. संगमनेर), संतोष राघू शिंदे (रा. राजापूर ता. श्रीगोंदा) आणि राजू उर्फ राजेंद्र भाऊ गागरे (रा. मांडवे खुर्द ता. पारनेर) अशी स्थानबद्ध केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाळू तस्कर, अवैध धंदे करणारे, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचे श्रीरामपूर, संगमनेर, पारनेर, बेलवंडी, लोणी या पोलीस ठाण्याकडून एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रस्ताव मागितले होते. यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अंतिम निर्णय घेऊन पाच जणांना 24 डिसेंबरपासून एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती करागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिले. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित तसेच पारनेर, बेलवंडी, संगमनेर, श्रीरामपूर, लोणी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारीसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक फौजदार मधूकर शिंदे, सोन्याबापू नाणेकर, पोलीस हवालदार रवींद्र कर्डिले, किरण जाधव, सुरज वाबळे, विजय वेठेकर, मनोज गोसावी, बबन मखरे, दत्ता गव्हाणे, विशाल दळवी, सचिन आडबल, आण्णा पवार, राहुल सोळूंके, भागीरथ पंचमुख, विजय ठोंबरे, प्रकाश वाघ, जालिंदर माने, योगेश सातपुते, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, संभाजी कोतकर, सचिन कोळेकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अक्षय फलके यांनी मदत केली.

धाबे दणाणले
एकाच वेळी पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये लेकुरवाळे वगळता चौघे वाळू तस्कर आहेत. जिल्ह्यात वाळू तस्करीतून मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. एकाच वेळी चार वाळू तस्करांवर एमपीडीएची कारवाई झाल्याने वाळू तस्करांचेही धाबे दणाणले आहेत.

विविध गुन्हे
एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या पाच सराईत गुन्हेगारांवर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, हत्यार प्रतिबंधक कायदा, चोरी, हाणामारी, खुनी हल्ला आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. प्रशांत लेकुरवाळे विरोधात कोपरगाव, श्रीरामपूरसह नारायणगाव (जि. पुणे) पोलीस ठाण्यांत एकूण सात गुन्हे आहेत. गणेश हाळनोर विरोधात राहुरी, श्रीरामपूर, लोणी पोलीस ठाण्यांत एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. कमलेश डेरे विरोधात संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. संतोष शिंदे विरोधात बेलवंडीत चार तर शिरूर (जि. पुणे) पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. राजू गागरे विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात तीन व घारगाव पोलीस ठाण्यात एक असे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या