पोलिसांच्या नाकावर टिच्चून शिर्डीत मटक्यासह गुटखा तेजीत
Featured

पोलिसांच्या नाकावर टिच्चून शिर्डीत मटक्यासह गुटखा तेजीत

Sarvmat Digital

साई मंदिराच्या अवतीभवती मटक्याचे जाळे; पोलिसांकडून कोणतीच कारवाई नाही

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात मटका व गुटखा यासारखे अवैध धंदे बंद झालेले नाहीत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आजही मटका अड्डे साईमंदिराच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर सुरू असून जाळे तयार झाले आहे. तर गुटख्याचीही विक्री रोखण्यात पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कारवाईनंतरही अवैध धंदे सुरूच असल्याने कारवाईवरच शंका उपस्थित केली जात आहे. अवैध धंदेवाल्यांशी काही पोलिसांचेच साटेलोटे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांची कारवाई केवळ फार्स ठरत आहे.

साईबाबांच्या शिर्डी नगरीत देश विदेशांतून लाखो भाविक साई समाधींच्या दर्शनासाठी येत असतात. अवैध धंदे वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. शहरातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कारवाया करायला पाहिजे, अशी मागणी साईभक्तांनी केली आहे. साईमंदिराच्या चोहोबाजूंनी अगदी हाकेच्या अंतरावर तब्बल दहा मटक्याच्या पेढ्या सुरू असून याबद्दल शहरात मोठी चर्चा सुरू आहे. शिर्डी पोलीस या अवैध धंद्यावर कारवाई का करत नाहीत याबद्दल ग्रामस्थ आणि साईभक्तांनी शंका उपस्थित केली आहे.

मागेही पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली होती; मात्र अवैध धंदे बंद होण्यास याचा काहीच उपयोग झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. आजही मटका अड्डे सुरूच आहेत. कारवाईनंतर हे अड्डे बंद होणे अपेक्षित होते. मात्र बुकींसह यंत्रणेवर काहीच फरक पडल्याचे जाणवत नाही. राज्यात गुटखाबंदीच्या काळातही किती मोठ्या प्रमाणात शिर्डीत गुटखा विक्री होत आहे. पान टपर्‍या, छोटी हॉटेल्स, किराणा मालाची छोटी दुकाने यातून सर्रासपणे गुटखा विक्री सुरूच आहे.

पोलिसांकडून किंवा अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई होईल याची भीतीही विक्रेत्यांच्या मनात येत नाही. जिल्ह्यात होणारी गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. मात्र यासंदर्भात काहीच हालचाली प्रशासनाकडून होत नसल्याने शिर्डी शहरात अवैध धंदे तेजीत सुरू आहेत.

शहरातील मटका अड्ड्यांचे सूत्रधार पोलिसांच्या रडारवर अजूनही आलेले नाहीत. बुकींकडे जमा होणारी मटक्याची रक्कम पुढे कोणाकडे जाते? ती घेणारे कोण आहेत? त्यांचे उद्योग कुठे सुरू असतात? याचा माग काढणे पोलिसांना अवघड नाही. मात्र मुळाशी जाण्याची मानसिकताच नसल्याने केवळ प्राथमिक कारवाई करून सूत्रधारांना मोकाट सोडले

माहिती मिळाल्यास कारवाई करू

शिर्डी शहरातील अवैध धंद्याबाबत आतापर्यंत सातत्याने जशी माहिती भेटत आहे त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. यामध्ये जुगार, दारू, मटका, वेश्याव्यवसाय आदींंवर कारवाई करण्यात आली असून मागील वर्षभरापासून अनेक गुन्हे आपण दाखल केले आहे. अशाप्रकारे अवैध धंदे व्यवसाय करणार्‍यांची माहिती मिळाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
– सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी

Deshdoot
www.deshdoot.com