पतीच्या मोबाईलमध्ये त्याच्या प्रेमसंबंधाचे आलेले व्हिडीओ पाहिल्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटविले
Featured

पतीच्या मोबाईलमध्ये त्याच्या प्रेमसंबंधाचे आलेले व्हिडीओ पाहिल्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटविले

Sarvmat Digital

पतीसह प्रेयसी व सासूवर गुन्हा । नेवासा तालुक्यातील घटना

सोनई (वार्ताहर)- पत्नीने पतीच्या मोबाईलमधे आलेले व्हिडिओ पाहिल्याने पत्नीला मारहाण, शिवीगाळ करून पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पतीसह प्रेयसी व सासूवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेली विवाहित तरुणी सौ. स्वाती शंकर दुर्गे (वय 22) रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा हिने दिलेल्या जबाबावरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिने फिर्याद जबाबात म्हटले की, पतीने माझ्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. एका महिलेशी प्रेम संबंधाबाबतचे व्हिडिओ पाहिल्याच्या कारणावरून पती शंकर पाराजी दुर्गे याने मला पेटविले. सासू चंद्रकला पाराजी दुर्गे व पतीचे प्रेमसंबंध असलेली महिला या तिघांनी संगनमत करून मला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 9 फेब्रुवारी 2020 रोजी ही घटना घडली असून माझे राहते घरीच मारहाण व पेटवण्याचा, जीवे मारण्याचा प्रयत्न पतीने केला.

पती शंकर दुर्गे याच्या मोबाईलमध्ये त्याच्या प्रेमसंबंध असलेल्या महिलेचे (आरोपी नं. 3) आलेले व्हिडिओ पाहिल्याच्या कारणावरून आपणाला शिवीगाळ, मारहाण करून पेटवून देण्याचा प्रकार झाला असल्याचे सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे घेतलेल्या जबाबात फिर्यादी सौ. स्वाती दुर्गे हिने म्हटल्याने सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी याबाबत भेट देऊन गुन्हा दाखल केला.

तिन्ही आरोपी पसार असल्याने कुणालाही अटक झालेली नसल्याचे पोलीस सुत्रांकडून समजले. सोनई पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com