शौचालयासाठी जाणार्‍या महिलांची छेड
Featured

शौचालयासाठी जाणार्‍या महिलांची छेड

Sarvmat Digital

16 जणांवर गुन्हा; भिंगारमधील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणार्‍या महिलांनाची छेड काढणार्‍या टोळक्यावरून भिंगारमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे सुमारे दोनशे ते अडीशे लोकांचा जमाव भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी लक्ष घालून वेळीच परिस्थिती हाताळली.

याप्रकरणी महिलांना त्रास देणार्‍या हयाब्रेड उर्फ शहाबाद, शहारुख शेख, सोहेल शहा, शोएब शहा, तन्नु ऊर्फ तन्वीर, सलमान शेख, जुबेर खान, अजर खान, भुर्या (पूर्ण नाव माहीत नाही), शौकत सुलेमान सय्यद उर्फ बब्बू, निसार शेख, तन्नुचा भाऊ, अन्वर शेख, सोनू शेख, शहारुख पठाण रिक्षावाले, टायगर (पूर्ण नाव माहित नाही) अशा 16 जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, शनिवारी रात्री भिंगारमधील वडारवाडी भागात काही महिला शौचालयासाठी जात असताना रस्त्यावर उभा असलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यावर महिलांनी आरडाओरडा केला. ओरडण्याचा आवाज येताच तेथे निलेश कोरडे व आकाश पवार हे दोघे आले. त्यांनी या टोळक्यांना जाब विचारला असता त्यांनाही या टोळक्याने मारहाण केली. ही घटना भिंगार शहरात वार्‍यासारखी पसरली.

रात्रीच्यावेळी सुमारे दोनशे ते अडीशे लोकांच्या जमावांनी भिंगार पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेबाबत कल्पना दिली. भिंगार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी जमावाला शांत करून महिलांना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.

एका महिलेच्या फिर्यादीवरून त्रास देणार्‍या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर त्रास देणारे टोळके पसार झाले. भिंगार पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com