Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

दुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

दैत्यनांदूर गोळीबार प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाथर्डी(तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून दोन गटांत झालेल्या गोळीबार प्रकरणात दुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दैत्यनांदूरचे सरपंच संजय बाबासाहेब दहीफळे यांना बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. याबाबत गणेश दहीफळे यांनी शहादेव दहीफळे यांच्या सह इतरांवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल केला आहेे. आता मात्र दुसर्‍या गटाकडूनही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण गोळीबार केल्याचे फिर्यादी व खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी शहादेव दहीफळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दैत्य नांदूर येथे 17 डिसेंबर रोजी राजकीय वादातून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेतील गोळीबारात सरपंच संजय दहीफळे यांचा मृत्यू झाला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गणेश रमेश दहीफळे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता दुसर्‍या गटाकडून खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी शहादेव दहीफळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोळीबार केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

शहादेव दहीफळे यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की भाऊ विष्णू दहीफळे हा संजय दहीफळे यांच्या पॅनेल विरुद्ध निवडणुकीत उभा होता व पराभूत झाला. 10 दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत विष्णू दहीफळे व संजय दहीफळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.17 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावातील मुंडे चौकात भाऊ विष्णूचा ओरडण्याचा आवाज आला. यावेळी सरपंच संजय दहीफळे व त्यांचे नातेवाईक भाऊ विष्णू यास काठ्या, कुर्‍हाडी, तलवारीने हाणमार करीत होते. संजय दहीफळे याने हातातील कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली.

यावेळी आम्हाला समोरील लोक ठार मारतील या भीतीने मी घरी पळत जाऊन 17 बोरची बंदूक घेऊन आलो व गोळी झाडली ती सरपंच संजय दहीफळे यांना लागली. त्यानंतर भाऊबहीण व इतर जखमींना उपचारासाठी घेऊन जात असताना कोरडगाव जवळ गाडी रस्त्याच्या खाली जाऊन गाडीची मोडतोड झाली असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत शहादेव दहीफळे यांच्या जबाबावरून संजय बाबासाहेब दहीफळे, ज्ञानेश्वर अशोक दहीफळे, बालू अशोक दहीफळे, सुधीर अशोक दहीफळे, गणेश रमेश दहीफळे, रमेश जिजाबा दहीफळे, भीमराव जिजाबा दहीफळे, विमल रमेश दहीफळे, स्वप्नाली ज्ञानेश्वर दहीफळे व गणेश रमेश दहीफळे यांची पत्नी यांच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या