डोक्यात कुर्‍हाड घालून खून करणार्‍यास अटक

डोक्यात कुर्‍हाड घालून खून करणार्‍यास अटक

तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुर्‍हाड घालून सतीश छबू यादव (वय 36) या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. याप्रकरणी फरार आरोपी गोरख संपत यादव (वय 39) यास तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीश छबू यादव यास दुपारच्यावेळी घरातून बोलावून घेत पूर्ववैमनस्यातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुर्‍हाड घालत सतीश छबू यादव यास जबर जखमी करण्यात आले. प्रकाश माधव यादव यांच्या यादववस्ती येथील राहत्या घरासमोर रविवारी भरदुपारी ही खुनाची घटना घडली. रक्तबंबाळ अवस्थेत सतीश यादव यास उपचारार्थ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच सतीश यादव यांचा मृत्यू झाला होता. या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह कौठेकमळेश्वर येथे धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या नेतृत्वाखालील हे. कॉ. लक्ष्मण औटी, विष्णू आहेर, राजू खेडकर, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, बाबा खेडकर, यमना जाधव, ओंकार शेंगाळ, लुमा भांगरे यांच्या पथकाने रात्रीच आरोपी गोरख संपत यादव (वय 39, रा. कौठेकमळेश्वर) यास कोकणगाव येथून ताब्यात घेत अटक करीत गजाआड केले. अवघ्या आठ तासांतच पोलिसांनी आरोपीस पकडले.

याप्रकरणी मयत सतीश यादव याचे वडील छबु माधव यादव (वय 66) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी गोरख संपत यादव याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं 218/2020 भा.द.वि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपी गोरख संपत यादव यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सहा दिवसांची (दि. 17 पर्यंत) पोलीस कोठडी देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी अधिक तपास करीत आहेत.

त्यांचा सुटकेचा निःश्वास
या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांचा या घटनेत सबंध नव्हता. आरोपी गोरख संपत यादव याने डोक्यात कुर्‍हाड मारल्याने सतीश यादव याचा मृत्यू झाला. फिर्यादीतही एकाच आरोपीचे नाव असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्य व्यक्तींवरील खुनाच्या आरोपाचे बालंट टळले. त्यामुळे संबंधितांनी सुटकेचा निश्वास टाकला. या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यासाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

AD
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com