शिंगवेतुकाई रस्तालूट; दोघा आरोपींना अटक
Featured

शिंगवेतुकाई रस्तालूट; दोघा आरोपींना अटक

Sarvmat Digital

सोनई (वार्ताहर)– नगर औरंगाबाद राज्यमार्गावर नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई येथे रस्तालूट केलेल्या दोघा आरोपींना सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस पथक व ग्रामस्थांच्या मदतीने अटक करण्यात आली. तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते.

याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की शिंगवे तुकाई शिवारात फिर्यादी रामदास बारकू ठोकळ (वय 37) रा. शिंगवे तुकाई हे गावातून फाट्याकडे मोटारसायकलवरून अंडी आणण्यासाठी चालले होते तेव्हा तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळची मोटरसायकल फिर्यादी ठोकळ यांच्या मोटरसायकलला आडवी लावून अडवली. फिर्यादीला चापटांनी व बुक्क्यांनी मारहाण करून धारदार शस्त्र दाखवून रोख रुपये 800 व मोबाईल चोरून नेले. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व ज्ञानेश्वर थोरात, पोलीस नाईक किरण गायकवाड, कॉन्स्टेबल श्री. भांड हे पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांनी खोसपुरी (ता. नगर) येथील ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी सुधीर कडूबाळ सरकाळे (वय 24) रा. शहर टाकळी ता. शेवगाव व अजय बाळासाहेब गुंजाळ (वय 24) रा. उंदीरवाडी ता. येवला यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. सज्ञान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. रोख रक्कम मोबाईल व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे यांच्या मार्गदर्शन खाली हवालदार अंकुश दहिफळे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com