Thursday, April 25, 2024
Homeनगरकोव्हिड 19 प्रमाणेच होणार टोमॅटोच्या विषाणूजन्य रोगाची तपासणी

कोव्हिड 19 प्रमाणेच होणार टोमॅटोच्या विषाणूजन्य रोगाची तपासणी

फळ, पान आणि बियाणे बेंगलोरच्या प्रयोगशाळेत रवाना

वीरगाव (वार्ताहर)- जागतिक पातळीवर टोमॅटो पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव केलेला ‘टोमॅटो ब्राऊन रुगोज फ्रुट व्हायरस’ सदृश रोगाची लक्षणे अकोले आणि संगमनेरच्या टोमॅटोवरही दिसून आल्याने त्याची तपासणी आता बेंगलोरच्या प्रयोगशाळेत होणार आहे. टोमॅटोवर आलेला रोग कोव्हिड 19 इतकाच घातक असून त्यामुळे लाखोंचा खर्च करून उभारलेली टोमॅटो शेती नेस्तनाबूत झाली आहे. अकोले संगमनेर तालुक्यात साधारणपणे 3000 हजार एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड गृहित धरल्यास एकरी 1 लाखांचा खर्च धरला तरी अंदाजे 30 कोटींचा आर्थिक फटका टोमॅटो उत्पादकांना बसला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे टोमॅटोची उभारणी केल्यानंतर शंभर टक्के खर्च झाल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसून येतात. टोमॅटोचे झाड आणि पाने पूर्णपणे निरोगी दिसत असले तरी झाडांची फळे पिवळी पडणे, फळाचा कडकपणा नाहीसा होणे असा प्रादुर्भाव दिसून येतो. फळे काढणीयोग्य झाल्यानंतर रोगाचे निदान होते. तोपर्यंत मात्र शंभर टक्के खर्च टोमॅटोच्या फडावर झालेला असतो. विचित्र अवस्थेमुळे बाजारात जाण्याची टोमॅटो फळांची अवस्था संपून जाते.

करोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने हैराण झालेले टोमॅटो उत्पादक या विषाणूजन्य रोगाने अधिक हतबल झाले. आयुष्यमान, 1057, अन्सल, 6242 या जातीच्या सर्व टोमॅटोवर हा विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणावर पसरल्याने सारी टोमॅटो शेती उद्ध्वस्त झाली. राहुरी विद्यापीठाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. कोळसे, संगमनेरचे विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, अकोल्याचे तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, पं. स. अकोलेचे कृषी अधिकारी सचिन कोष्टी, विश्व हायटेक नर्सरीचे विरेंद्र थोरात यांनी तालुक्यातील टोमॅटो शेतीवर जाऊन पाहणी करून पंचनामे केले.

प्रचंड मागणी असलेल्या रसरशीत टोमॅटोवर कोव्हिड 19 सारखाच विषाणू आल्याने शेतकर्‍यांना कोट्यवधीचा आर्थिक फटका बसला. शासनाने आणि शास्त्रज्ञांनी यावर वेळीच उपाययोजना न केल्यास अकोले-संगमनेर तालुक्यातील टोमॅटो शेती कायमस्वरुपी उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

RNA च्या मदतीने तपासणी
करोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या तपासणीत विषाणू शोधासाठी RNA- पध्दतीचा अवलंब केला जातो. टोमॅटोचे फळ, पान आणि बियाणांच्या तपासणीसाठीही याच पध्दतीचा वापर होणार असून सारे नमुने बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्टीकल्चर रिसर्च (IC-R)कडे रवाना करण्यात आले. पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या परवानगीने हे सारे नमुने बंद वाहनातून बेंगलोरच्या प्रयोगशाळेत कृषी खात्याने पाठविले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल.

रासायनिक अंशाची खाजगी तपासणी
कोणत्याही पिकात रासायनिक अंश किती आहेत याची तपासणी केली जाते.परंतु महाराष्ट्रात ही तपासणी करणार्‍या प्रयोगशाळाही खाजगी आहेत.ज्यांचा तपासणी अहवाल शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरला जात नाही.पिकातील रासायनिक अंश तपासणीच्या प्रयोगशाळाही अद्याप शासकीय नाहीत ही बाब राज्यातील शेती क्षेत्राबाबतचे औदासिन्य स्पष्ट करते.

हरित क्रांती नावापुरती
महाराष्ट्रातील हरित क्रांतीचा मोठा डांगोरा पिटला जातो. चार कृषी विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत. परंतु विषाणूजन्य रोगांच्या तपासणीसाठीची एकही प्रयोगशाळा महाराष्ट्रात नाही. त्यासाठी आजही बेंगलोरच्या प्रयोगशाळेचा आधार घ्यावा लागतो. शेतीच्या विकासावर कायम पोटतिडकीने बोलणारांकडून या विषयाचा पाठपुरावा होईल अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या