Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली

कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली

दुकाने, आठवडे बाजार बंद असल्याने अनेकांपुढे यक्ष प्रश्न

अहमदनगर (वार्ताहर) – कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी नगर तालुक्यातील रुईछत्तीसी, वाळकी, जेऊर, चिचोंडी पाटील, देहेरे आदी मोठ्या गावांतील आठवडे बाजार बंद केले. यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. दहिगाव, डोंगरगण येथील सात दिवस चालणारा राम जन्मोत्सवही बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून लग्नसमारंभ, गावोगावी होणारे धार्मिक कार्यक्रम आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शहराबरोबरच आता गावातील सर्वच व्यवसायांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. नागरिक फक्त महत्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावातील मुख्य बाजारपेठा, चौक, पार, छोटछोटे चहाचे स्टॉल, सलून दुकाने गर्दीने गजबजलेले असत. कोरोनाच्या भितीने सर्वत्र शुकशुकाट आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. परिसरातील विवाह तसेच इतर शुभकार्य पुढे ढकलले आहेत. रुईछत्तीसी, वाळकी, चिचोंडी पाटील, चास, देहरे या गावांच्या आसपासच्या गावांची अर्थव्यवस्था या मोठ्या गावातील आठवडे बाजारावर अवलंबून आहे. छोटे व्यावसायिक, भाजीपाला, धान्ये-कडधान्य, शेतकी साहित्ये या आठवडेबाजारातूनच खरेदी केली जाते. आठवडे बाजार बंद झाल्याने आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, तसेच सोशल मीडिया आदीद्वारे होणार्‍या जनजागृतीमुळे तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम भागातील खेड्यात रहाणार्‍या लोकांनाही कोरोनाचे गांभीर्य कळले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी महिलाही शेतीकामासाठी जाताना तोंडाला स्कार्फ बांधून जाताना दिसत आहेत. तालुक्यातील गावांमध्ये प्रशासनानेे दिलेल्या सूचनांचे पालन होत आहे.

चिचोंडी पाटील येथे तहसीलदार उमेश पाटील यांनी भेट दिली. सर्व ग्रामस्थांना व हॉटेल व्यावसायिकांना गर्दी न करण्याचे व अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कुठलेही दुकान चालू न ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुईछत्तीसी येथे कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर, सरपंच मीनाक्षी जगदाळे यांच्या जनजागृतीतून गावातील आठवडे बाजार, हॉटेल्स, दुकाने, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद ठेवले आहेत.

डोंगरगण येथे सरपंच कैलास पटारे यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामस्थांना कोरोना व्हायरसविषयी मार्गदर्शन केले. आजाराची लक्षणे तसेच टाळण्यासाठी ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती सांगितली. खोसपुरी येथे सरपंच सोमनाथ हारेर व उपसरपंच अल्ताफ बेग यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात आले. तेथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवला.

पांढरीपूल हे नगर-औरंगाबाद महामार्गावरील व्यवसायासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील भेळ राज्यात प्रसिद्ध असल्याने येथे थांबणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पांढरीपूल परिसरातील हॉटेल, बार, सांस्कृतिक कला केंद्र व इतर व्यवसाय काही काळासाठी बंद ठेवण्याबाबतचे निवेदन खोसपुरी ग्रामस्थांनी सरपंच हारेर यांना दिले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या वतीने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच हारेर यांनी केले. साकतखुर्द येथे ध्वनिवर्धक लावून सकाळ संध्याकाळी जनजागृती केली जात आहे.

कोरोनाची साथ चालू असल्याने नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गर्दी, जमाव करू नये. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कुठलेही दुकान चालू ठेवू नये. नागरिकांनी घाबरून न जाता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.
– उमेश पाटील, तहसीलदार नगर तालुका

कोरोना संदर्भात अफवा पसरवू नयेत. तसेच अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
– रवींद्र भापकर, उपसभापती, पंचायत समिती,

हातावर पोट असणार्‍यांचे हाल
नगर तालुक्यातील खेड्यापाड्यातून हातावर पोट असणारे अनेकजण नित्याने नगर शहराकडे धाव घेतात. परंतु कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नगर शहरच बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळेनासे झाले. कुटुंब कसे चालवायचे असा यक्ष प्रश्न मोलमजुरी करणार्‍यांसमोर निर्माण झाला आहे.

आज भाजी मार्केट बंद
कोरोनाला आळा घालण्यासाठी तसेच रविवारी होणार्‍या कर्फ्यूमध्ये सामील होण्यासाठी दादा पाटील शेळके कृषिउत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केट रविवारी बंद राहणार आहे. शेतकर्‍यांनी भाजीपाला घेऊन येऊ नये. तसेच जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन सभापती अभिलाष घिगे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या