Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोनावरील लस येण्यास अवधी लागण्याची शक्यता

कोरोनावरील लस येण्यास अवधी लागण्याची शक्यता

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे : लॉकडाऊनमुळे आजार फैलावण्याचे प्रमाण घटले

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनामुळे देशात आजार फैलावण्याचे प्रमाण सुदैवाने 1.83 वरून 1.55 पर्यंत कमी झाले आहे. जगातील इतर प्रगत देशांमध्ये लॉकडाऊन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना फैलावला असून त्याचे प्रमाण 2.5 वरून 5.7 पर्यंत वाढले आहे. कोरोनावरील उपचारासाठीची लस बाजारात येण्यास किमान एक ते दिड वर्षांचा कालावधी लागू शकतो. तो पर्यंत आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीष सोनवणे यांनी केले आहे.

- Advertisement -

डॉ. सोनवणे म्हणाले, देशात लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. देशातील कोरोना फैलावाचे प्रमाण कमी होत आहे. आपल्या देशात 6 ते 11 एप्रिल या कालावधीत कोरोना फैलावण्याचे प्रमाण 1.83 वरून 1.55 पर्यंत कमी झाले आहे. देशभरात लॉकडाऊन, सुरक्षित सामाजिक अंतर, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे यासारख्या उपक्रमांमुळे हे प्रमाण कमी होत आहे. आजार फैलावण्यास भोगोलिक परिस्थिती व वातावरणासारख्या गोष्टीही अवलंबून असू शकतात.

जगातील प्रगत देशांमध्ये लॉकडाऊन न केल्यामुळे कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्युचे प्रमाण हे तीन ते पाच टक्यांपर्यंत असून हे सर्व टाळायचे असेल तर सर्वांनी कठोर निर्णय घेत काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांची काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. या आजाराची लस येण्यास अवधी आहे. त्यामुळे याची तीव्रता किमान दीड ते दोन वर्षे राहणार असल्याने तोपर्यंत सर्वांनी मास्क वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, वारंवार हात धुणे आदी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. सोनवणे यांनी म्हटले आहे.

लस उपलब्धतेसाठी दीड वर्षाचा कालावधी
कोरोना संसर्गापासून देशासह जगभरातील औषध कंपन्यांकडून लस निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्वात लवकर शोधलेल्या इबोलाची लस बाजारात येण्यासाठी पाच वर्ष लागले होते. कुठल्याही लसच्या उपचाराअगोदर त्याची गुणवत्ता, सुरक्षितता, परिणामकारकता अशा विविध गोष्टींची खात्री करावी लागते. कोरोना लस निर्मितीसाठी भारतात सुमारे पाच तर जगभरात सुमारे 70 ठिकाणी संशोधन सुरु आहे. ही लस उपलब्ध होण्यासाठी किमान दीड वर्ष लागू शकतात. कोरोना आजार लगेच संपण्याची परिस्थिती नाही. आपल्याला काही वर्ष या आजाराशी संघर्ष करावा लागणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या