Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोना..उष्णतेची लाट.. ‘अवकाळी’चा तडाखा

करोना..उष्णतेची लाट.. ‘अवकाळी’चा तडाखा

नगरकर हैराण

अहमदनगर (प्रतिनिधी)– एकीकडे करोना तर दुसरीकडे उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस यामुळे नगरकर पुरते हैराण झाले आहेत. काल अचानकपणे राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यात काही भागात तसेच राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात अचानक पाऊस आल्याने शेतात पडलेला कांदा, मका, गहू आणि ज्वारी झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली.

- Advertisement -

करोना संसर्गामुळे आधीच लॉकडाऊनमुळे अडचणी सापडलेल्या शेतकर्‍याच्या मुळावर आता अवकाळी पाऊस उठला आहे. रविवारी दुपार ते सायंकाळी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. यात शेतीसह कांदा, फळपिके, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जामखेडमध्ये अंगावर वीज कोसळून एक जखमी झाला आहे.

श्रीरामपूर शहर व परिसरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळ सुरू झाले. काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. त्यानंतर रात्री जोरदार पावसास सुरूवात झाली होती. वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे शेतात पडलेला गहू आणि कांदा पिकाचे नुकसान झाले.

भोकर येथील वार्ताहराने कळविले की, श्रीरामपूर तालुक्यातील भोकर, खोकर परिसरात जोरदार वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
भोकर, खोकर परिसरात काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वारे आले. या वादळाने अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या त्याच बरोबर अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांच्या कैर्‍या तुट्न पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

तसेच या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार झाला होता. त्याच बरोबर खंडित वीजपुरवठ्यामुळे व रिमझिम पावसाने रात्रभर उकाडयाने अनेकांना रात्र जागवून काढावी लागली.रात्री 10.30 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने काहि शेतकर्‍यांचा कांदा भिजला तर अनेक शेतकर्‍यांना कांदा चाळ झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. राहुरी तालुक्यातील वांबोरी आणि परिसरात वादळी पाऊस झाला. राहाता तालुक्यातील अस्तगाव, पुणतांबा परिसरात वादळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील कांदा व सोंगून झालेला गहू झाकण्यासाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडाली.

जामखेड तालुक्यातील तालुक्यातील शिऊर, देवदैठण, नाहूली, तेलंगशी, जायभायवाडी, मोहरी, खर्डा, सातेफळ, वंजरवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, जवळके, नान्नज, हळगाव, धोंडपारगाव, झिक्री, पाडळी, खुरदैठण, नायगाव, सावरगाव, मोहा, हपटेवाडी, नानेवाडी या परिसरात दुपारी साडेतीन ते पाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वादळी वार्‍याने थैमान घातले. गाराचा पाऊस आणि विजेच्या लखलखाटाने भीतीचे वातावरण निर्माण झाले. नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडून ते जखमी झाले तर बसरवाडी येथे गारपीटाने झोडपल्याने पाच शेळया मृत्यू पडल्या यासह विजेचा खांब घरावरील पत्रे, नान्नज येथे विजेच्या तारा तुटल्या, झाडे उन्मळून पडली होती.

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगावसह परिसरात गारपीट झाली.तर काही भागात पाच वाजण्याच्या सुमाराला आलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. कांदा झाकण्यासाठी पळापळ झाली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकणगाव परिसरात गारपीट झाल्याने कांदासह अन्य पिकांचे नुकसान झाले. भाव नसल्याने कांदा काटणी करून साठवून करण्यात येत आहे.

नगर शहरात सातच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह वादळ झाले. त्यांनतर पावसाच्या सरींचा शिडकाव झाला. नगर तालुका, राहुरी तालुक्यातील काही भागात रात्री उशीरापर्यंत आकाशा वीजांचा लखखखाट आणि जोदार वादळी वारे वाहत होते. अचानक पावसाचे वातावरण तयार झाल्याने साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी वादळामुळे नेहमीप्रमाणे वीज गायब झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या